नांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदार

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. काँग्रेसचे विजय सोनारे, गंगासागर पेदेवाड, छाया कानघुले तसेच वंचित बहुजन आघाडीचे आनंद चव्हाण यांच्या संयुक्त प्रचारफेर्यांना नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभत असून, प्रचारादरम्यान होत असलेला संवाद या प्रभागातील राजकीय वातावरण तापवणारा ठरत आहे.
प्रभाग क्रमांक चार हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नांदेड शहरात आजपर्यंत जे काही महत्त्वाचे विकासकामे झाली आहेत, त्यामागे काँग्रेसचे योगदान आहे, हे उमेदवार ठामपणे मांडत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, गृहनिर्माण व नागरी सुविधांचा पाया काँग्रेसच्या काळातच भक्कमपणे घातला गेला, असा दावा प्रचारात सातत्याने केला जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये काँग्रेसविषयी आपुलकी व विश्वासाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस-वंचित आघाडीने या निवडणुकीत शहरातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांना केंद्रस्थानी ठेवत सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी, दर्जेदार आरोग्य सेवा, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना तसेच वंचित व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा स्पष्ट निर्धार या आघाडीने व्यक्त केला आहे. सत्ता नव्हे, तर सेवा हा दृष्टिकोन घेऊन नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उमेदवार सांगत आहेत. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सभांमधील गर्दी व सकारात्मक वातावरण पाहता प्रभाग चारमध्ये काँग्रेस-वंचित आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. एकूणच या प्रभागात निवडणूक रंगतदार होत असून, काँग्रेस-वंचित आघाडी मजबूत स्थितीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

COMMENTS