सुरक्षेचा बागुलबुवा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सुरक्षेचा बागुलबुवा

भारतातील सर्वोच्च प्रमुख, ज्यांची हाती वास्तविक सत्ता आहे, असे पद म्हणून पंतप्रधान पदाचा आवर्जून उल्लेख केला जातो. भारताच्या तिन्ही दलाचे सरसेनापती म

कठोर कायद्याने अत्याचार थांबेल का ?
महाराष्ट्राची झेप…
नोटबंदीची वैधता आणि परिणाम

भारतातील सर्वोच्च प्रमुख, ज्यांची हाती वास्तविक सत्ता आहे, असे पद म्हणून पंतप्रधान पदाचा आवर्जून उल्लेख केला जातो. भारताच्या तिन्ही दलाचे सरसेनापती म्हणून राष्ट्रपतींचा उल्लेख केला जात असला, तरी सर्व शक्ती पंतप्रधानांच्या हाती निहित आहे. असे असतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुरक्षेचा पंजाबमध्ये केलेला बागुलबूवा समोर आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी परत दिल्लीला जातांना विमानतळावर म्हटले आहे की, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिंवत पोहचू शकलो. वास्तविक पाहता पंतप्रधान पदावरील व्यक्तीचे हे विधान अनावश्यक असून, उतावीळपणा, आक्रस्ताळेपणातून आलेले आहे. पंतप्रधान मोदी हे पंजाबमधल्या हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी भटिंडा इथे पोहचले. तेथून ते प्रत्यक्ष स्मारकाच्या इथे हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने जाण्याचा पर्याय टाळण्यात आला. हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल 2 तासांचा होता. या प्रवासात शेतकरी आंदोलक निदर्शने करत होती. वास्तविक पाहता, अचानक पंतप्रधान मोदी यांनी प्रवासात केलेला हा बदल या वादाला कारणीभूत ठरला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडे त्याबद्दल अहवाल मागितला आहे. पंजाबात पंतप्रधानांच्या सुरक्षेत बेजबाबदारपणा समोर आला आहे. पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर 20 मिनिटांपर्यंत अडविला गेला, यादरम्यान अप्रिय घटना घडू शकली असती, याबद्दल गृह मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली. पंतप्रधानांची सभा रद्द होण्यामागे काँग्रेसचे कटकारस्थान आहे, असा आरोप भाजपने केला आहे. दुसरीकडे, शेतकर्यांचा विरोध आणि मोदींबद्दल पंजाबातील जनतेला असलेला राग ही सभा रद्द होण्यामागचे मुख्य कारण आहे, असा दावा राज्यातील शेतकरी संघटनांनी केला आहे. वास्तविक पाहता पंतप्रधान पदाच्या सुरक्षेत कुठेही त्रुटी नव्हत्या. आणि जे शेतकरी आंदोलक पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्यासाठी जमले होते, त्यांची पंतप्रधानांना इतकी का भीती वाटत असावी. याउलट पंतप्रधानांनी त्या शेतकर्‍यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांना सामौरे जाण्याचे धैर्य दाखवले असते, तर पंतप्रधान पदाची गरिमा आणखी वाढली असती. मात्र अलीकडच्या काळात राजकारणातील खिलाडूवृत्ती हरवली असून, लोकांत मिसळण्याचे प्रमाण कमी होतांना दिसून येत आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते कधीही माध्यमांना सामौरे गेले नाहीत. त्यांचे प्रश्‍न काय आहे, याला उत्तर द्यायला त्यांनी स्वतःला कधीही बांधील समजले नाही, तोच प्रकार मोदी यांनी पंजाबमध्ये अवलंबला. लोकांचे प्रश्‍न समजून घ्यायचे नाही, त्यांचा विरोध तीव्र झाला तर तोंड फिरवून मागे फिरायचे, असाच प्रकार त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत सातत्याने अवलंबल्याचे दिसून येते. यापूर्वी देखील देशाच्या माजी पंतप्रधान दिवगंत इंदिरा गांधी यांना देखील अशाप्रकारे निर्दशनांचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पळ न काढता त्या धीरोदत्तपणे त्या निदर्शकांना सामौरे गेल्या, आणि त्यांचे प्रश्‍न आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या इतक्या धीरोदत्तपणे ते सगळं ऐकून घेत होत्या की, विरोधकांचा विरोध केव्हा मावळला हे त्यांना देखील कळले नाही. कारण त्याकाळात सरकारला, पंतप्रधानांला जनतेला आपल्याविषयी काय वाटते, आपण कुठे कमी पडतो, हे जाणून घेण्याची इच्छा होती, आणि सरकार, पंतप्रधान त्या दृष्टीने पावले उचलायची. असाच प्रकार एकदा पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी देखील घडला होता.
दुसरीकडे, केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडून अहवाल मागितला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिरोजपूर दौर्‍यात बुधवारी सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. यावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारला एक सविस्तर अहवाल मागविला आहे. अशी घटना खपवून घेणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिला आहे. तसेच या प्रकरणी जबाबदारी निश्‍चित केली जाईल, असे म्हणत अमित शहांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये दाखल झाले होते. फिरोजपूर येथे त्यांचा कार्यक्रम होता. मात्र तिथे पोहचण्याआधीच पाकिस्तान सीमेपासून जवळ असलेल्या हुसैनीवाला येथे पंतप्रधानांचा ताफा निदर्शकांकडून रोखण्यात आला. साधारण 20 मिनिटे पंतप्रधानांचा ताफा एकाच ठिकाणी होता. त्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. त्यानंतर कोणताही धोका न पत्करता पंतप्रधान माघारी फिरले व त्यांनी आपले पुढील कार्यक्रम रद्द केले. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी राज्यसरकारला गंभीर इशारा दिला असतानाच भाजपचे अनेक मंत्री आणि नेत्यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारवर तोफ डागली आहे. त्याचवेळी भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून त्यात, पंतप्रधानांवर हल्ला करण्याचे पाकिस्तान, खालिस्तानी समर्थक आणि काँग्रेसचे कारस्थान हाणून पाडले गेले, असे म्हटले आहे.

COMMENTS