Homeताज्या बातम्यासंपादकीय

महायुतीतील नाराजीचा ‘उदय’!

राज्यात 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर जे निकाल लागले, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. अडीच वर्षांच्या सरकारनंतर पुन्हा राज

उद्धव ठाकरे कुठे चुकले ?
पाणीटंचाईचे संकट
भारताचा वाढता प्रभाव

राज्यात 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर जे निकाल लागले, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. अडीच वर्षांच्या सरकारनंतर पुन्हा राज्यात एका नव्या युतीचा म्हणजेच महायुतीचा जन्म झाला. खरंतर लोकसभा निवडणुकीतील कमी जागा मिळाल्यानंतर खडबडून जागा झालेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत अनेपेक्षित निकाल देत सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यानंतर मात्र महायुतीत नाराजीनाट्य सुरू असल्याच्या चर्चा रंगतांना दिसून आल्या. त्या म्हणजेच एकनाथ शिंदें मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नव्हते, तसेच उपमुख्यमंत्री स्वीकारण्यास तयार होताच, त्यांनी गृहमंत्रीपद मिळण्याची टाकलेली अट यावरून महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर शिंदे आपल्या मूळ गावी म्हणजेच दरे या गावी गेल्यानंतर पुन्हा त्याच चर्चा सुरू झाल्या, मात्र अखेर एकनाथ शिंदे मंत्रिमंंडळात दाखल झाले, त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले, त्यासोबतच नगरविकासमंत्री पद देखील देण्यात आले. मात्र तरीही महायुतीतील नाराजीनाट्य संपले नसल्याच्या चर्चा रंगत होत्या. पालकमंत्रीपदावरून सुरू असलेली धुसफूस, अखेर नाशिक आणि रायगड या जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की ओढवली. इथंपर्यंत सर्व ठीक होते, मात्र काँगे्रस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत नवा उदय होणार असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली, त्यातच एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी गेल्यामुळे यात भरच पडली.
वास्तविक पाहता उदय सांमत यांच्यासोबत किती आमदार आहेत, आणि ते खरंच शिंदेंच्या भाषेत उठाव करणार का? हा महत्वाचा प्रश्‍न आहे. उदय सांमत सध्या स्वित्झर्लंडमध्ये गुंतवणूक परिषदेत सहभाग घेण्यासाठी गेलेले असतांना अशी राळ उठवण्यात आली. वास्तविक पाहता ही राळ जर शपथविधीपूर्वी उठवण्यात आली असती, तर या चर्चेला किंमत असती, मात्र आजमितीस या चर्चेला शून्य किंमत आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थिर आहे, भाजपने या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकत आपल्या सरकारला कोणताही धोका नसल्याचे सिद्ध केले आहे. शिंदे किंवा अजित पवार गट जरी सरकारमधून बाहेर पडला तरी, सरकार अल्पमतात येणार नाही, याची तजवीज मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून ठेवली आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये एखादा पक्ष दबावगट निर्माण करून आपल्या मागण्या मान्य करून घेईल, मात्र सत्तेतून बाहेर पडेल, अशी शक्यता नाही. तसेच राज्यात नवे राजकीय समीकरण येण्याची एक टक्केही शक्यता नाही, त्यामुळे वडेट्टीवार यांनी केलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळतो. मात्र यासोबतच एक शक्यता ग्रहित धरली जावू शकते ती म्हणजे, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येवू शकतात, मात्र या शक्यताच दिसून येतात. खरंतर आगामी काही दिवसांवर म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू शकतात, असा अंदाज आहे. कारण नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. याचाच अर्थ आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येवू घातल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुंबई महापालिकेत सत्ता टिकवणे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. ते आव्हान स्वीकारण्यापेक्षा आणि थेट लढत देण्याऐवजी, मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणुका लढवल्या तर, याचा विचार करून उद्धव ठाकरे भाजपशी जवळीक वाढवतांना दिसून येत आहे. सत्तेतून पाच वर्ष बाहेर राहून पक्षही वाढवता येणार नाही, आणि संघटनही वाढवता येणार नाही, त्यामुळे सत्तेच्या छत्रछायेत गेल्यास मुंबई महापालिकेत देखील सत्ता मिळू शकते, त्यामुळेच हा नवीन उदयाला जन्म देण्यासाठी नियोजनबद्धरित्या आखणी तर सुरू नाही ना? अशी शंका येते. खरंतर राजकारणात शंका घेण्यास वाव नाही, कारण नवीन राजकीय समीकरणे काय जुळतील ते सांगता येत नाही. त्यामुळे ठाकरे पुन्हा भाजपसोबत येण्यास इच्छूक असतील तर, भाजप त्यांना घेण्यास नक्कीच तयार असतील, मात्र शिंदें आणि ठाकरे यांचे समीकरण कसं जुळवायचे, हाच भाजपसमोर सर्वात मोठा प्रश्‍न असेल, त्याचे उत्तर कदाचित काळच देईल.

COMMENTS