अहमदनगर/प्रतिनिधी ः 50 हजार रुपयांची लाच मागणी व लाच मागणी पडताळणीदरम्यान पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डिजिटल व्हाईस रेकॉर्डर घेऊन पळालेल्या
अहमदनगर/प्रतिनिधी ः 50 हजार रुपयांची लाच मागणी व लाच मागणी पडताळणीदरम्यान पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डिजिटल व्हाईस रेकॉर्डर घेऊन पळालेल्या पोलिस अंमलदाराला अटक करण्यात आली आहे. एकनाथ पंडित निपसे (वय 42) असे अटक केलेल्या अंमलदाराचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
काळ्या बाजारात विक्री केल्या जाणार्या तांदूळ प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी पोलिस अंमलदार निपसे याने दुकानदाराकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याची तक्रार दुकानदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे लाच मागणी पडताळणी पंचासमक्ष सुरू असताना अंमलदार निपसे हा डिजिटल व्हाईस रेकॉर्डर घेऊन पसार झाला होता. त्याच्याविरुध्द देहरे (ता. नगर) येथील तक्रारदारांच्या फिर्यादीवरून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, भादंवि 392, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 16 फेब्रुवारी 2023 रोजी कोतवाली पोलिस ठाणे परिसरात घडली होती.
पसार अंमलदार निपसे याचा लाचलुचपत विभागाकडून शोध सुरू होता. दरम्यानच्या काळात त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा सरकारी वकिलांमार्फत न्यायालयात म्हणणे सादर केले होते व त्याच्या अटकपूर्व जामिनाला विरोध दर्शविला होता. अंमलदार निपसे याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्यानंतर तो स्वत: लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजर झाला. त्याला अटक करून सोमवारी (दिनांक 13 मार्च) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक शरद गोर्डे करीत आहेत.
COMMENTS