Homeताज्या बातम्या

नांदेड महापौरपदाची रंगतदार चुरस : खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मनात नेमके कोण?

10 फेब्रुवारपर्यंत नवीन महापौर व उपमहापौर नांदेड शहराला मिळणारनांदेड । प्रतिनिधी नांदेड महानगरपालिकेत नवनिर्वाचित खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेवि

जाहीर सभेत अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी
धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो – अशोक चव्हाण
मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात खलबते

10 फेब्रुवारपर्यंत नवीन महापौर व उपमहापौर नांदेड शहराला मिळणार
नांदेड । प्रतिनिधी
 नांदेड महानगरपालिकेत नवनिर्वाचित खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकांमध्ये महापौरपदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, या सर्व हालचालींचे केंद्रबिंदू ठरले आहेत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण. नवनिर्वाचित नगरसेविकांनी स्वतंत्रपणे तसेच सामूहिकरीत्या आपली मते खासदार चव्हाण यांच्यासमोर मांडल्याचे समजते. विशेष म्हणजे सर्व जुन्या व नव्या नगरसेविकांनी आपण महापौरपदासाठी सक्षम असल्याचा दावा केल्यामुळे, चार नगरसेविकांना प्रत्येकी सव्वा वर्षे या पद्धतीने महापौरपद देण्याचा रोटेशन फॉर्म्युला ठरल्याची जोरदार चर्चा आहे.
या रोटेशनमध्ये पहिल्या टर्ममध्ये महापौरपद कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.  ज्योती  कल्याणकर, कविता मुळे, सदिच्छा सोनी, शांभवी साले, वैशाली  देशमुख, सुदर्शना खोमणे, मंगला देशमुख, सुवर्णा बसवदे, रुची भारतीया, कविता गड्डम यांसह अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये काही नावे वारंवार पुढे येत असली, तरी अंतिम निर्णय खासदार अशोकराव चव्हाण यांच्याच हातात असल्याचे स्पष्ट आहे. तरोडा व सिडको या भागाला आजवर महापौरपद मिळाले नसल्याने, या भागातून पहिल्या टर्मला महापौर व्हावे अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.  यामुळे भौगोलिक समतोल हा देखील निर्णयामागील एक महत्त्वाचा निकष ठरणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाळू खोमणे हे आपल्या पत्नी तथा नवनिर्वाचित नगरसेविका सुदर्शना खोमणे यांना महापौर करण्यासाठी सक्रिय असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या नांदेड दौर्‍यावेळी शहरात लावलेले बॅनर्स, जाहिराती आणि केलेली तयारी या मागेही हीच राजकीय रणनीती असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे, संघ परिवारातून आलेल्या भाजपाच्या माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या कन्या शांभवी साले यांचे नावही आघाडीवर आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनाचा थेट अनुभव नसल्यामुळे त्यांचे नाव ज्योती कल्याणकर व वैशाली देशमुख यांच्या तुलनेत थोडे मागे असल्याचे जाणकारांचे मत आहे. जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमध्ये रुची भारतीया यांचे नाव सातत्याने पुढे येत असून, पक्षातील एकनिष्ठतेचा लाभ त्यांना मिळू शकतो. सोमवारी खासदार अशोकराव चव्हाण दिल्लीला रवाना होत असताना अनेक नगरसेविकांचे पती विमानतळावर उपस्थित होते. खासदारांशी थोडा जरी संवाद साधता आला तरी आपली बाजू मांडता येईल, या आशेने ही गर्दी असल्याचे समजते.  यावरूनच महापौरपदासाठीची चुरस किती तीव्र आहे, हे स्पष्ट होते. खा. अशोकराव चव्हाण हे निर्णय घेताना तीन प्रमुख बाबी पाहतील, अशी शक्यता आहे – पक्षातील निष्ठा, भौगोलिक समतोल आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. या निकषांवर पाहता ज्योती कल्याणकर, वैशाली देशमुख आणि रुची भारतीया यांची नावे तुलनेने मजबूत वाटतात. मात्र मुख्यमंत्री गटाकडून येणारा दबाव लक्षात घेतल्यास सुदर्शना खोमणे यांचे पारडेही जड होऊ शकते. अंतिमतः अशोकराव चव्हाण कोणाला पहिल्या टर्मसाठी महापौरपदाची माळ घालतात, यावर नांदेडच्या महापालिकेतील आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.

नांदेड शहराचे महापौर पद ज्या महिलेला द्यावयाचे आहे ती महिला नांदेड महानगरपालिका हाताळण्यासाठी राजकीय व प्रशासकीय दृष्ट्या सक्षम असायला हवी. महापालिका कायद्यांचा अभ्यास व सभागृह चालविण्याची हातोटी असणारी महिला खासदार अशोकराव चव्हाण निवडतील अशी अपेक्षा असली तरी या निवड प्रक्रियेमध्ये भाजपाचे महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजुरकर व स्थायी समितीचे माजी सभापती तथा नवनिर्वाचित नगरसेवक किशोर स्वामी यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये अत्यंत सूक्ष्म नियोजन व सक्षम प्रचार यंत्रणा राबविल्यामुळे खासदार अशोकराव चव्हाण जे म्हणतील ती पूर्व दिशा सध्या नांदेड भाजपात असल्यामुळे त्यांच्या मनातील कार्यक्षम व सक्षम नगरसेविकेलाच महापौरपद मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो.

COMMENTS