Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत भरपाईसाठी पाठपुरावा करणार

मंचर / प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागासह अन्य भागात अवकाळीमुळे कांदे, बटाटा, वाटाणा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथी महिलांनी केली आरती
आबासाहेबांच्या वसतिगृहामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले
शिक्षकांच्या सभेत गोंधळ…धक्काबुक्की व तोडफोड

मंचर / प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागासह अन्य भागात अवकाळीमुळे कांदे, बटाटा, वाटाणा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जातील. शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

वळसे पाटील यांनी पुण्याचे नियोजित दौरा रद्द करून सोमवारी (ता. 27) कुरवंडी, भावडी, थूगाव, कारेगाव या परिसरात शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

आदर्शगाव कुरवंडीच्या सरपंच मनीषा सुनील तोत्रे, शेतकरी लक्ष्मण गावडे, विकास बारवे यांनी झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती सांगितल्यानंतर वळसे-पाटील यांच्यासह अधिकारी वर्ग भावनावश झाले. उपस्थितांची मने हेलावली. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, उपसभापती सचिन पानसरे,संतोष धुमाळ, विकास बारवे थुगावचे उपसरपंच भूषण एरंडे, कृषी सहाय्यक प्रमिला मडके उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित असलेले आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ, सहायक निबंधक (सहकार) विठ्ठल सूर्यवंशी यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे व जिल्हाधिकारी पुणे यांना अहवाल सादर करण्याचे आदेश वळसे पाटील यांनी दिले.

अनेक शेतकर्‍यांनी बँका व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडून कांदा, बटाटा व अन्य पिकांसाठी कर्ज घेतले आहे. अनाहूतपणे अस्मानी संकट कोसळल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पळवून नेला आहे. सरकारने लवकर मदत केली नाही.तर शेतकर्‍यांना जगणे अवघड होईल. – जितेंद्र तोत्रे (उपसरपंच आदर्शगाव कुरवंडी, ता.आंबेगाव)

आंबेगाव तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल, ग्रामविकास, कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचारी अश्या एकूण 30 जणांची नियुक्ती केली आहे. पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना दिलेल्या आहेत. दोन दिवसात पंचनामे पूर्ण होईल. त्याचा अहवाल त्वरित जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सादर केला जाईल. गोविंद शिंदे (प्रांताधिकारी आंबेगाव-जुन्नर विभाग मंचर)

COMMENTS