अलीकडच्या काळात जगाचे लक्ष प्रामुख्याने मध्यपूर्वेतील संघर्ष, विशेषतः इराण आणि अमेरिकेशी संबंधित घडामोडींवर केंद्रित असताना, अचानक अमेरिका आणि इट
अलीकडच्या काळात जगाचे लक्ष प्रामुख्याने मध्यपूर्वेतील संघर्ष, विशेषतः इराण आणि अमेरिकेशी संबंधित घडामोडींवर केंद्रित असताना, अचानक अमेरिका आणि इटली या दोन महत्त्वाच्या पाश्चिमात्य मित्रदेशांमधील एका राजनैतिक वादाने आंतरराष्ट्रीय चर्चांना उधाण आले आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आहेत इटलीच्या पंतप्रधान जिऑर्जिया मेलोनी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. सुरुवातीला हा वाद एका फोटोपुरता मर्यादित वाटत होता. परंतु पुढे तो दोन देशांमधील परस्पर आदर, राजनैतिक शिष्टाचार आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्वाच्या प्रश्नांपर्यंत पोहोचला. त्यामुळे हा केवळ वैयक्तिक संघर्ष नसून पश्चिमी आघाडीतील अंतर्गत तणावाचे प्रतीक म्हणूनही पाहिला जात आहे.फ्रान्समध्ये झालेल्या जी-७ संम्मेलना दरम्यान ट्रम्प आणि मेलोनी यांची भेट झाली होती. त्यानंतर एका मुलाखतीत ट्रम्प यांनी दावा केला की मेलोनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रह करत होत्या किंवा विनवणी करत होत्या आणि त्यांनी दयाळूपणे त्यांना तो फोटो दिला. ट्रम्प यांच्या या विधानानंतर मेलोनी यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी हा दावा “पूर्णपणे बनावट” असल्याचे म्हटले आणि “मी किंवा इटली कधीही कोणाकडे भीक मागत नाही” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी हे वक्तव्य मित्रदेशाच्या नेत्याविषयी अनादर दर्शवणारे असल्याचेही सांगितले. आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रप्रमुखांचा सन्मान हा त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठेशी जोडलेला असतो. ट्रम्प यांच्या विधानामुळे मेलोनी यांची प्रतिमा कमी लेखली गेली असल्याची भावना इटलीमध्ये निर्माण झाली. इटलीतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध केला. विशेष म्हणजे इटलीचे परराष्ट्रमंत्री ऍन्टानियो ताजानी यांनी अमेरिकेचा नियोजित दौरा रद्द केला. त्यांनी ट्रम्प यांची टिप्पणी इटलीचा अपमान असल्याचे म्हटले. मेलोनी यांना अनेक विश्लेषक ट्रम्प यांच्या युरोपमधील सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक मानत होते. त्यांनी ट्रम्प यांच्या राष्ट्रवादी आणि पुराणमतवादी विचारसरणीशी अनेकदा सहमती दर्शवली होती. ट्रम्प यांच्या शपथविधीलाही मेलोनी उपस्थित राहिल्या होत्या. परंतु गेल्या काही महिन्यांत दोघांमध्ये मतभेद वाढू लागले. इराणविषयक अमेरिकन धोरण, युरोपवरील अमेरिकन आर्थिक दबाव, व्हॅटिकन आणि पोपविषयी ट्रम्प यांच्या काही वक्तव्यांबाबतची नाराजी, युक्रेन आणि युरोपीय सुरक्षाविषयक मतभेद या मुद्द्यांमुळे दोन्ही नेत्यांमधील जवळीक कमी झाल्याचे विश्लेषक मानतात.विशेष म्हणजे जी-७ परिषदेदरम्यान सार्वजनिकरीत्या दोन्ही नेत्यांनी सौहार्दपूर्ण वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला होता. काही वृत्तांनुसार परिषदेत त्यांनी आम्ही नेहमीच मित्र राहिलो आहोत, असेही म्हटले होते.सध्या उपलब्ध माहितीनुसार हा वाद मुख्यतः ट्रम्प यांच्या वैयक्तिक टिप्पणीमुळे निर्माण झाला आहे. तथापि पार्श्वभूमीला इराणबाबतचे धोरणात्मक मतभेद महत्त्वाचे ठरतात.इराणविषयक अमेरिकन भूमिकेमुळे युरोपातील अनेक देशांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मेलोनी यांनी काही प्रसंगी अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आधीपासूनच तयार होत असलेल्या तणावाला या फोटो प्रकरणाने ठिणगी पडली असे म्हणता येईल. मात्र, या दोन्ही देशातील ऐतिहासिक राजकीय संबंध पाहिल्यास इटली हा नाटोमधील महत्त्वाचा सदस्य आहे, अमेरिका आणि इटली यांच्यात संरक्षण, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात घनिष्ठ सहकार्य आहे, दोन्ही देश युरोप-अटलांटिक सुरक्षा व्यवस्थेचे महत्त्वाचे भागीदार आहेत. केवळ एका वक्तव्यामुळे दीर्घकालीन राजनैतिक संबंध तुटतील अशी शक्यता कमी आहे. इतिहास पाहिला तर अनेकदा राष्ट्रप्रमुखांमध्ये वैयक्तिक संघर्ष झाले आहेत, पण राष्ट्रीय हितसंबंधांमुळे देशांनी सहकार्य कायम ठेवले आहे.शीतयुद्ध हा शब्द दोन महासत्तांमधील व्यापक राजकीय, लष्करी आणि वैचारिक संघर्षासाठी वापरला जातो. अमेरिका आणि इटली हे अजूनही नाटोचे मित्रदेश आहेत. व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रांतील सहकार्य सुरूच आहे. निर्माण झालेला हा वाद राजनैतिक संबंधांमध्ये तात्पुरता तणाव निर्माण करू शकतो. परंतु तो शीतयुद्धाच्या पातळीवर जाईल असे कोणतेही ठोस संकेत सध्या उपलब्ध नाहीत.मेलोनी यांनी ट्रम्प यांच्या दाव्याला सार्वजनिकरित्या खोटे ठरवले, तर ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे इटलीत तीव्र प्रतिक्रिया उमटली. परराष्ट्रमंत्र्यांचा दौरा रद्द होणे ही त्याची राजनैतिक झलक होती. तरीही सध्या हा वाद प्रामुख्याने राजकीय आणि प्रतीकात्मक स्वरूपाचा आहे; तो तात्काळ मोठ्या आंतरराष्ट्रीय संघर्षात रूपांतरित होईल असे दिसत नाही. मात्र यांमुळे अमेरिका आणि युरोपमधील नेतृत्वसंबंधी तणाव पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.


COMMENTS