महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार विचका झालेला दिसून येतो, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्येे जागा वाटपाचा गुंता हा शेवटपर्यंत सुटेल की नाही,
महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार विचका झालेला दिसून येतो, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्येे जागा वाटपाचा गुंता हा शेवटपर्यंत सुटेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होेत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन देखील महायुतीचा देखील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे हा गुंता वाढतच जाण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे शिवसेनेचे दोन गट अस्त्विात आले, त्यानंतर राष्ट्रवादीचे देखील दोन गट अस्तित्वात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जागा वाटपाचे चित्र पाहिले तर दोन राष्ट्रीय पक्ष काँगे्रस आणि भाजप समोर आहेत. तर काँगे्रस अर्थात महाविकास आघाडीच्या बाजून ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र असून, त्यात वंचितने उडी घेतली आहे. वंचितने महाविकास आघाडीसमोर ठेवलेल्या अटी आणि निवडून आल्यानंतर कोणताही खासदार किंवा कोणताही पक्ष भाजपसोबत जाणार नाही, याचे लेखी आश्वासन मागितल्यामुळे महाविकास आघाडीची गोची होतांना दिसून येत आहे. शिवाय वंचित आघाडीला दोन जागा देऊन त्यांची बोळवण करू असे महाविकास आघाडीला वाटले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर वाटते तेवढे सोपे गणित नाही. त्यामुळेच वारंवार चर्चा फिस्कटतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता ठाकरे गटातील 13 खासदार बाहेर पडल्यानंतर देखील ठाकरे गट सर्वाधिक जागा मागत आहेत, याचेच आश्चर्य वाटतांना दिसून येत आहे. आजमितीस ठाकरे गटाकडे विद्यमान खासदारांचे संख्याबळ अल्प आहे. अशावेळी त्यांना नवख्या उमेदवारांना संधी देऊन आपल्या जागा निवडून आणण्याचे मोठे आव्हान आहे. अशावेळी ठाकरे गटाने आपल्या कोट्यातील काही जागा वंचितला सोडल्या आणि त्याचबरोबर काही जागा काँगे्रस आणि राष्ट्रवादीने सोडल्या तर, वंचित समाधानी होऊन या महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकेल, यात कोणतीच शंका नाही. मात्र आपलं राखून ज्या जागेवर आपला उमेदवार निवडून येणार नाही, अशा जागा इतर पक्षाला द्यायचा अर्थात वंचितला द्यायच्या असाच इरादा महाविकास आघाडीतील पक्षांचा दिसून येत आहे. त्यामुळे जागावाटपांचा गुंता शेवटच्या टप्प्यात सुटेल की, वंचित स्वबळाबर लढेल, याचा अंदाज काही दिवसांतच स्पष्ट होईल. महायुतीचे देखील घोडे अडल्याचे दिसून येत आहे. शिंदे गट किमान आपल्या विद्यमान 13 खासदारांच्या 13 जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे भाजप किमान 32-34 जागांवर लढण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे शिंदे गटाला 10च्यावर जागा मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक खासदार नाराज होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार गट देखील किमान 10 जागा मिळाव्यात या अपेक्षेवर असला तरी अजित पवार गटाला 6 जागांच्यावर जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीतील राजकीय गुंता आता राजधानीत सुटणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना राजधानी दिल्लीत बोलावले असल्याचे समजते. त्यामुळे आता राजधानीत महायुतीचा कोणता फॉर्म्युला ठरतो, यावर बरेच राजकीय गणित अवलंबून असणार आहे. पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशावेळी लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सोडवण्याची आवश्यकता आहे. मात्र जागावाटप योग्य प्रमाणात न झाल्यास अनेक राजकीय नेते आपल्या मूळ पक्षात परतू शकतात, अशी दाट शक्यता असल्यामुळे जागावाटपास शक्य तेवढा उशीर करण्याची मानसिकता दिसून येत आहे. जर शिंदे गट किंवा अजित पवार गटातील इच्छूकांना खासदारकीचे तिकीटे मिळाली नाहीत तर, ते आपल्या मूळ पक्षात परतू शकतात, त्यामुळे आगामी काही दिवसांत आयाराम-गयाराम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य पक्षांतर रोखण्याचे मोठे आव्हान विद्यमान राजकीय पक्षांसमोर असणार आहे.
COMMENTS