Homeताज्या बातम्यासंपादकीय

नीती, गती आणि व्यवहार ! 

भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार असतानाही विरोधात बसावे लागण्याची टिमकी वाजविणारा एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट हे विसरला की, केवळ भाजपमुळे ते मुख्यम

जर्मनीत फॅसिस्ट बोकाळले !
ब्राह्मणेतर चळवळीची शकले : ओबीसी-मराठा संघर्ष! 
राजकीय भूमिकेतील ईव्हीएम !

भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार असतानाही विरोधात बसावे लागण्याची टिमकी वाजविणारा एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट हे विसरला की, केवळ भाजपमुळे ते मुख्यमंत्री आणि सत्ताधारी बनू शकले. मोदी-शहा यांच्या जोडीला कोणाला कोणत्या ठिकाणी बसवावं याची परिपक्व राजकीय जाण आहे. राज्याला हे चांगल्या प्रकारे कळते की, शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर केवळ केंद्रातील दोन धुरीणांनी बसवले आहे. शिंदे गटाला सत्तेत बऱ्यापैकी मोकळीक त्यांनी दिली आहे.‌ एरव्ही, मोदी-शहा हे अशाप्रकारची मोकळीक सत्तेत कुणाला देत नाहीत. यावर आज बोलण्याचे कारण असे की, शिंदे गटाचे अनेक नेते भारतीय जनता पक्षाला संख्याबळाचे उणेदुणे सुनावत आहेत. जे की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी अजिबात जुळणारे नाही.‌ दूरचित्रवाहिन्यांवर एरव्ही ढसाढसा रडणारे कोकणातील एक संपलेले नेते माझे नाव…अमुक अमुक असल्याचे धमकावताहेत. ज्यांना विधानसभेत निवडून येण्याची कधी हमी देता आली नाही, ते आता, स्वतःला ताकदवर नेते म्हणवून घेत आहेत.‌खरेतर या बाबी हास्यास्पद आहेत. दुसरीकडे, उबाठा नावाच्या गटाने थेट नितीन गडकरी यांनाच पक्षात येऊन मुख्यमंत्री बनविण्याची वल्गना केली आहे.‌ राजकारणात उंचसखल आराखडा सतत होत असतो. परंतु, त्यातून मुरब्बी, मुरलेले, मुत्सद्दी नेते मार्ग काढून घेतात. ही जाणत्या नेत्यांची खासियत असते. अशाप्रकारची खासियत नितीन गडकरी यांनी अनेकवेळा सिध्द केली आहे. पक्ष आणि प्रत्यक्ष सत्ता यावर बसलेल्या धुरीणांच्या नीती, गती आणि व्यवहारानेच राजकारण वाटचाल करीत असते. अर्थात, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, म्हणून त्यांची नीती-गती आणि व्यवहार चालेल असं समजणं म्हणजे स्वतःच्या शक्तीचे स्वतःलाच आकलन नसल्याचे द्योतक आहे.‌

शिंदे हे एका प्रादेशिक पक्षात एका जिल्ह्याच्या पावभागाचे नेते होते आणि आहेत. परंतु, याचा अर्थ त्यांची नीती-गती-व्यवहार हा केंद्रातील मोदी-शहा आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक बलशाली झालाय का? राज्यातील प्रादेशिक नेतृत्वांनी यावर जरूर तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना एक दिखाऊ दबावतंत्र यापलिकडे या गोष्टींना काहीही महत्व राहिलेले नाही. मोदी-शहा जोडी जेव्हा कुणाला सत्तेवर बसवतात तेव्हा सर्वप्रथम त्या नेत्याच्या बंडखोरीच्या शक्तीचा निप:त करून टाकतात. शक्तीपात झालेल्या नेत्यांनी शक्तीचे उसणे अवसान आणून शड्डू ठोकण्याचा हा काळ निश्चित नाही. किंबहुना, तशी शक्ती असणारा नेता आता प्रादेशिक पक्षांमध्ये क्वचितच उरला आहे. देशात १४ मार्चपर्यंत लोकसभा निवडणूकीची घोषणा होण्याची दाट शक्यता असल्याने सर्वपक्षीय नेते उसणे अवसान आणून आपल्या ताकदीचे तकलादू प्रदर्शन करित आहेत. परंतु, केंद्रात मोदी-शहा आणि राज्यात फडणवीस यांनी दाखवलेली राजकीय मुत्सद्देगिरी यातून राज्यातील प्रादेशिक नेते फार काही करू शकतील, असे वाटत नाही. किंबहुना, भारतीय जनता पक्षासोबत सत्तायुती केलेल्या पक्षांनी हे वास्तव लक्षात घेऊन आपल्या रोजच्या वल्गना थांबविणे त्यांच्या हिताचे आहे. अन्यथा, राजकारणात त्यांचे अस्तित्व, “न बजेगा बांस, न रहेगी बासुरी”, अशा प्रकारचे म्हणजे राजकीय शक्तीपात होण्यात जमा होईल, याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे, भाजपासोबत राजकीय सत्तेत बसलेल्या प्रादेशिक नेत्यांनी फार मोठ्या गमजा मारू नये, त्यांच्या वास्तविक ताकदीचा जनतेला चांगला अंदाज आहे….!

COMMENTS