कवडगाव (बु.) : येथील श्री संत वैराग्यमूर्ती महामेरू तथा संत परीक्षक गोरोबाकाका यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्या

कवडगाव (बु.) : येथील श्री संत वैराग्यमूर्ती महामेरू तथा संत परीक्षक गोरोबाकाका यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील भाविकांनी एकत्र येत या कार्यक्रमात सहभाग नोंदवत संत परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
या निमित्ताने सकाळी 10 ते 12 या वेळेत गावातील भजनी मंडळांच्या वतीने संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भजनसंध्येत भक्तिरसाने ओथंबलेले अभंग, संतवाणी तसेच भगवंताच्या नामस्मरणाचे गायन करण्यात आले. उपस्थित भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिभावाने भजनाचा आनंद घेतला. दुपारी 12 वाजता सर्व भाविकांच्या उपस्थितीत श्री संत गोरोबाकाका यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्प व अक्षदा उधळत पुण्यतिथी सोहळा पार पडला. त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील हभप चोले महाराज, हभप बबन महाराज शिंदे, पखवाज वादक हभप महादेव महाराज पवळ, कांता महाराज मुंडे, श्रीहरी महाराज मुंडे, बजरंग महाराज चव्हाण, दत्ता महाराज लेंडाळ, बाबू जोगदंड, आश्रुबा शेजाळ, बाबरे महादेव, बाबासाहेब रासवे, जगन काळे, शुभम उंडाळकर, अशोक उंडाळकर, डॉ. महादेव करडकर तसेच वडवणी तालुका अध्यक्ष बळीराम करडकर यांच्यासह गावातील माता-भगिनी, भजनी मंडळ व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवडगाव येथील कुंभार समाज बांधवांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

COMMENTS