Homeताज्या बातम्यासंपादकीय

पुरोगामी चळवळीचा आधारवड

खरंतर महाराष्ट्र  राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,  राजर्षी शाहू महाराजांचा विचाराचा वारसा आहे. त्यामुळे या राज्यात जसा पुरोगामी विच

क्रीडाक्षेत्रातील लैंगिक शोषण
राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान
लोकलचा जीवघेणा प्रवास

खरंतर महाराष्ट्र  राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,  राजर्षी शाहू महाराजांचा विचाराचा वारसा आहे. त्यामुळे या राज्यात जसा पुरोगामी विचार रुजला वाढला तसा विखारी विचार देखील वाढले. मात्र महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा वारसा घेवून अनेक विचारवंत आपले आयुष्य जगले. त्यामध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल प्रा. हरी नरके यांचे. त्यांनी आपली उभी ह्यात महात्मा फुले, सावित्रीबाईंचे विचार घरोघरी पोहचवण्यासाठी आपली उभी ह्यात खर्ची घातली. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि परदेशात देखील त्यांनी व्याख्याने देत जनजागृती केली. मात्र हरी नरके यांच्या अकाली मृत्यूने महाराष्ट्राची मोठी हानी झाली, ती कधीही भरून निघणारी नाही. खरंतर हरी नरके यांनी ज्या पुण्यातून आपल्या कार्याला आणि कामाला सुरूवात केली, त्याच पुणे शहरात दोन प्रवाह होते. पुणे शहर म्हणजे महात्मा फुले यांच्या कार्याची भूमी. तर दुसरीकडे हेच पुणे शहर एकेकाळी पेशव्यांचा बालेकिल्ला आणि कडवा जातभिमान बाळगणार्‍यांचा जिल्हा. मात्र याच शहरापासून नरके यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. सुरूवातील अगोदर एका कंपनीत काम करत-करत त्यांनी विचारांच्या कक्षा रुंदावत, महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास सुरू ठेवला. त्यासाठी त्यांनी केलेले संशोधन, संदर्भासाठी त्यांनी केलेला अभ्यास थक्क करणारा होता. मुळातच हरी नरके ज्याप्रमाणे एक संशोधक होते, त्याचप्रमाणे ते एक कार्यकर्ता होते. आयुष्यात शिकायचे असते, याची प्रेरणाच मुळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाल्याने हरी नरके यांच्या आयुष्यात त्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीत त्यांनी जनजागृती करत, तुरुंगवास देखील भोगला. या तुरुगांच्या काळात अनेक विचारवंतांचा सहवास त्यांना लाभला आणि त्यातून  महात्मा फुले यांचे कार्य, त्याचे महत्त्व याच्याशी परिचय झाल्यानंतर नरके यांनी तोच आपल्या अभ्यासाचा विषय निवडला आणि त्यामध्ये अक्षरश: जीव ओतून काम केले. त्यांनी उभा ह्यातीत तब्बल 50 पेक्षा अधिक पुस्तकांचे लिखाण केले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष, महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर मराठी भाषेलाअभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे. प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी 2011 पासून ते ऑगस्ट 2023 पर्यंत त्यांनी ब्लॉग लिहिले. फेसबुकवही ते लिखाण केले. प्रा. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला होता.  ओबीसींच्या प्रश्‍नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्‍नांवरून सत्ताधार्‍यांना अनेकदा धारेवर धरले होते. महाराष्ट्र शासनाने ’समग्र महात्मा फुले’ नावाचा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला. त्याचे हरी नरके संपादक होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा ही दोन पुस्तके त्यांची लोकप्रिय होती. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याविषयी हरी नरके यांनी समग्र लिखाण केलं. महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन करणारे संशोधक म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित होते. महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात हरी नरके यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळतांना दिसून येत आहे.

COMMENTS