Homeताज्या बातम्याक्रीडा

टिम इंडिया जिंकली ; पाकिस्तान हरला 

क्रिकेट समिक्षक.

क्रिकेट हा किती अजब खेळ आहे बघा ना. क्रिकेटचा सामना म्हंटलं की हार जित होणारच असते. परंतु एकाच वेळेस दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने आले तर त्य

कोल्हापूरच्या अभिज्ञा हिस वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक
एमएस धोनीची हेअरस्टाईल चर्चेत, जुन्या लूक मध्ये दिसले
ऑटोग्राफनंतर एमएस धोनीने चाहत्याकडून मागितले चॉकलेट

क्रिकेट हा किती अजब खेळ आहे बघा ना. क्रिकेटचा सामना म्हंटलं की हार जित होणारच असते. परंतु एकाच वेळेस दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने आले तर त्यांच्यातील लढत क्रिकेट शौकीनांसाठी पर्वनीच ठरते. मात्र तेच दोन देश इतरत्र आपले सामने वेगवेगळ्या संघासोबत खेळत असले तर त्यांच्या समर्थकांनाही ‘कोण कितने पाणी मे ‘ हे समजून जाते. सध्या असेच दोन कट्टर प्रतिस्पर्धी किंवा दुश्मन म्हंटले तरी कोणी गैर मानू नये, ते पाकिस्तान व भारत विदेश दौऱ्यांवर आहेत. पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) अंतर्गत कसोटी मालिका खेळत आहे. तर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात टि२०, वनडे व डब्ल्यूटीसी अंतर्गत कसोटी मालिकाही खेळणार आहे.

              भारताने आपल्या दौऱ्याची सुरुवात पावसाच्या छायेत झालेल्या टि२० मालिकेने केली. त्या मालिकेतील तीन सामन्यांपैकी प्रत्येकी एक सामना भारत, आफ्रिका व पावसाने जिंकल्याने मालिका बरोबरीत झाली. तर तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना भारताच्या नवोदित खेळाडूंच्या संघाने एकतर्फी जिंकून मालिकेत आघाडी घेतली. तर ऑस्ट्रेलिया विरूध्द जगातल्या सर्वात वेगवान खेळपट्टी असलेल्या पर्थ येथील मैदानावर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत पाहुण्या पाकिस्तानचा खरपूस समाचार घेताना पाकिस्तानात विदेशी संघ गेल्यावर जशी ट्रिटमेंट देतात अगदी तशीच पाकिस्तानला देऊन गुणतालिकेतून पाकची अव्वल स्थानावरून गच्छंती केली आणि याचा लाभ दुसऱ्या क्रमांकावरील भारताला झाला. सध्या तरी भारत डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. यापूर्वी झालेल्या दोन विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धांच्या फायनलमध्ये पोहोचण्यास टिम इंडिया यशस्वी ठरली होती हे सर्वश्रूत आहेच.

                रविवारी द.आफ्रिकेविरूध्द जोहान्सबर्ग येथील पहिल्या वनडे सामन्यात पूर्ण क्षमतेने खेळणाऱ्या द. आफ्रिकेला टिम इंडियाने खेळाच्या सर्वच क्षेत्रात हद्दपार करून आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे एकटा कुलदिप यादव सोडल्यास कोणताही वर्ल्डकप २०२३ मध्ये खेळलेला गोलंदाज भारतीय संघात नव्हता. तर फलंदाजात श्रेयस अय्यर व के.एल राहुल हेच दोन अनुभवी फलंदाज संघात होते. भारताचा संघ वनडे विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना वगळता बाकीच्या दहा सामन्यात खेळला त्याहीपेक्षा सरस खेळ या सामन्यात नवोदितांच्या चमूने केला.

                द.आफ्रिकेच्या ज्या फलंदाजांनी विश्वचषक स्पर्धेत विरोधी गोलंदाजांचे शिकरण केले त्याच मातब्बर फलंदाजांचे भरीत भारताच्या नवोदित गोलंदाजांनी केले आणि तेही केवळ दोनच वेगवान गोलंदाज आफ्रिकेच्या नामवंत फलंदाजांना भारी ठरले. आपल्या चिरपरिचीत मैदानावर नाणेफेक जिंकून द.आफ्रिकन कर्णधार एडन मार्करमने प्रथम फलंदाजी घेतली. भारताच्या नवोदित गोलंदाजांचा कुचिंबर करून टाकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या द.आफ्रिकन फलंदाजांना पहिल्या चेंडू पासूनच संकटांना सामोरे जावे लागले. मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर रीसा हेंड्रीक्स बाद होता परंतु कर्णधार राहुलने डिआरएस न घेतल्याने भारताची बळी मिळवण्याची संधी हुकली. चांगली गोलंदाजी करून भले मुकेशला बळी मिळाला नसला तरी फारसी अपेक्षा नसलेल्या अर्शदिपसिंगने पहिल्या स्पेलमध्ये चार प्रमुख बळी मिळून द.आफ्रिकेच्या शिडातली हवाच काढून घेताना पाच बळींचा आपला पंचक साधला. अर्शदिप यापूर्वी तीन वनडे खेळला मात्र त्यामध्ये त्याला बळींचे खातेही उघडता आले नव्हते. अर्शदिप एका बाजूने कातिलाना मारा करत असताना दुसऱ्या बाजूने आवेश खानचा आवेश काही कमी नव्हता. त्यानेही चार बळी मिळवून  द.आफ्रिकन फलंदाजांना पळता भुई थोडी केली. विशेष म्हणजे आवेश व अर्शदिप दोघेही प्रत्येकी एकदा हॅट्रीक घेण्याच्या स्थितीत आले होते. मात्र त्यांना हॅट्रीक साधता आली नाही. आवेश व अर्शदिप या दोघांनी १८ षटकात केवळ ६८ धावा देऊन नऊ बळी मिळवून आपला ठसा उमटविला. भविष्यात त्यांची हिच कामगिरी त्यांचा आत्मविश्वास वाढवून टिम इंडियाच्या फायद्याची ठरू शकते. कुलदिपला एक बळी मिळाला. एकवेळ शंभरीही गाठेल का नाही अशी शक्यता वाटत असताना आफ्रिकेचा डाव ११६ धावात आटोपला.

              एकशे सतरा धावांचे लक्ष घेऊन उतरलेला भारतीय संघ ऋतूराज गायकवाडच्या लवकर झालेल्या पतनाने बावरला नाही तर उलटत पदार्पणवीर साई सुदर्शन नाबाद ५५ व श्रेयस अय्यर ५२ यांच्या झंझावाती खेळाच्या बळावर विक्रमी २०० चेंडू व ८ गडी राखून विजयी झाला. मालिकेतील उर्वरीत दोन पैकी एक जरी सामना भारताने जिंकला तर मालिका भारताच्या खिशात जाईल.

                दुसरीकडे पर्थला ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला झुंजण्याची संधीच दिली नाही. ऑस्ट्रेलिया नेहमीप्रमाणे परिस्थिती व खेळपट्टीचा अभ्यास करून एक मजबूत संघ घेऊन मैदानात उतरला. तर त्या उलट परिक्षेत कुठलाही अभ्यास न करता एखादा विद्यार्थी जसा मोघम उत्तरं देतो अगदी तशीच अवस्था पाकिस्तानची झाली. खेळपट्टी व वातावरण यांची कोणतीच शहानिशा न करता त्यांनी संघ निवडताना आठ फलंदाज घेऊन फलंदाजी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. तर एक शाहिन आफ्रिदी हा अनुभवी वेगवान गोलंदाज संघात घेतला. तर आमिर जमाल व शेहजाद खुर्रम हे पदार्पण करणारे नवे जलद गोलंदाज निवडले. ऑस्ट्रेलियात खेळायचे म्हंटले तर त्यांचे वीस खेळाडू कमीत कमी धावात बाद करणारे गोलंदाज संघात असावे लागतात. येथेच पाकिस्तानचे गणित फसले. फहिम आश्रफ, आगा सलमान, साऊद शकील हे कामचलाऊ अष्टपैलू यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवणे म्हणजे येडया गबाळ्याचा खेळ नाही. विशेष म्हणजे पदार्पण करणारे जमाल व खुर्रम यांनी अतिशय प्रभावी कामगिरी केली. तर आफ्रिदी सारखा अनुभवी गोलंदाज शाळकरी मुलांसारखा वाटला.                      प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने वॉर्नरचे १६४ धावा या मोठया शतकाच्या बळावर ४८६ धावा फलकावर लावल्या व त्यानंतर पाकची लंबीचौडी फलंदाजांची फळी फॉलोऑनही वाचवू शकली नाही. २७१ धावांवरच त्यांचे ताबूत थंडावले. मात्र ऑस्ट्रेलियाने पाकला फलंदाजीस पुन्हा न  पाठवता स्वत: फलंदाजी करून एकूण ४७९ धावांचे लक्ष पाकिस्तान समोर विजयासाठी ठेवले. या मोठया लक्षाचा पाठलाग तर सोडाच केवळ त्याच्या दबावाने पाकिस्तानच्या फलंदाजांचे पाय थरथरले व केवळ ८९ धावात चारीमुंडया चित झाले. कांगारूंचा ३६० धावांचा मोठा विजय त्यांना मालिकेत आघाडीवर घेऊन गेला. आता उर्वरीत सामन्यात पाकिस्तान चमत्कार करतो की, शेपूट घालून माघारी येतो हे येणारा काळच ठरवेल.

COMMENTS