अहिल्यानगर : शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल संजय खामकर यांची लंडनमधील ग्रेस इन येथे 24 व 25 एप्रिल रोजी होणार्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

अहिल्यानगर : शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल संजय खामकर यांची लंडनमधील ग्रेस इन येथे 24 व 25 एप्रिल रोजी होणार्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित परिषद महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, मुंबई विद्यापीठ आणि ग्रेस इन, यूके यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.
या परिषदेत डॉ. आंबेडकर यांच्या कायद्याशी संबंधित योगदान, सामाजिक न्यायाची कल्पना आणि आर्थिक धोरणांवर चर्चा केली जाणार आहे. विशेषतः त्यांच्या लंडनमधील शिक्षणाचा प्रभाव या विषयावर भर दिला जाणार आहे. स्वप्निल खामकर यांच्या निवडीमुळे शहरासह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या परिषदेत जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक, धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. प्रमुख चर्चेचे विषय आंबेडकरांचे कायदेशीर योगदान, समावेशक विकास, सामाजिक न्याय चळवळी आणि आजच्या काळातील त्यांचे विचार किती लागू आहेत, यावर आधारित असणार आहेत. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना खामकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय व समानतेच्या क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले, तिथे जाऊन त्यांच्या विचारांवर चर्चा करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे. उद्योजकता विकास, युवक सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय क्षेत्रात कार्यरत असलेल्या खामकर यांच्या सहभागातून चर्चा घडणार आहे. लंडन येथील आंतरराष्ट्रीय संमेलनात निवड झाल्याने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, उद्योग मंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, शहराचे आमदार संग्राम जगताप व चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी स्वप्निल खामकर यांचे अभिनंदन करुन परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.
लिखाण तरूणांसाठी स्फूर्ती देणारे
स्वप्निल खामकर याने युवकांसाठी लिहिलेल्या झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईंड या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन नुकतेच राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले. तो 2017 मध्ये इंजिनिअरिंगच्या तिसर्या वर्षात असताना वास्को-द-गामा वर आधारित 8 द गेम इज ऑन हा पुस्तक लिहिणारा महाराष्ट्रातील अत्यंत कमी वयाचा दुसरा युवक ठरला होता. त्याने ट्रॅडिशनल पब्लिशर ओथरचा मान मिळवला असून, त्याचे लिखाण युवकांना स्फूर्ती देणारे ठरत आहे.
COMMENTS