Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊस दराचा स्वतंत्र फॉर्म्युला शेतकर्‍यांच्या लुटीसाठी; 1 डिसेंबरला राजारामबापू कारखान्यात काटा बंद आंदोलन

इस्लामपूर / प्रतिनिधी : ऊस उत्पादक शेतकर्‍यांची तब्बल 110 कोटींची लूट करण्यासाठी ऊस दराचा स्वतंत्र फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी काढला

वीज यंत्रणेवरील स्थानिक कर आकारणीतून महावितरणला सूट
सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढ करणारच : आ. चंद्रकांत जाधव
कराड शहरातील थकबाकीदार आता झळकणार फ्लेक्सवर

इस्लामपूर / प्रतिनिधी : ऊस उत्पादक शेतकर्‍यांची तब्बल 110 कोटींची लूट करण्यासाठी ऊस दराचा स्वतंत्र फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी काढला आहे. आम्हाला तो अजिबात मान्य नाही. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराबाबत झालेला तोडगा तसाच कायम ठेवावा. अन्यथा 1 डिसेंबरला इस्लामपुरात राजारामबापू साखर कारखान्याचा काटा बंद आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत केली.
इस्लामपूरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार बैठकीत माजी खा. शेट्टी यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने सरासरीने किती कोटींची लूट करणार आहेत याचा पाढा वाचला.
शेट्टी म्हणाले, सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा आहे. सांगली जिल्ह्यातील कारखानदार आंदोलनाला दाद देत नाहीत. त्यांनी केलेल्या नवीन फॉर्म्युल्यावर शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. पुढारीच आपले पैसे वाचवत आहेत. नेत्यांनी आपल्या सोयीप्रमाणे ऊस दराचा फॉर्म्युला बनवल्याचे स्पष्ट होत आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 96 कोटी 46 लाखांचा फटका यंदा बसेल. गेल्या हंगामातील बारा कोटी 52 लाखाचा फटका उत्पादक शेतकर्‍यांना बसणार आहे. जिल्ह्यातील कारखानदारीत राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव व कारंदवाडी या तीन युनिट मधूनच दोन्ही हंगामातील ऊस दराचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीत फारसा बदल नाही असे असले तरी सांगली जिल्ह्यात ज्यादा रिकव्हरी असणारे कारखाने आहेत. तरीही कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबरीने दर देत नाहीत.
ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी एक डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पुरवठा बंद करावा. कारखानदारांना अद्दल घडवण्याची हीच वेळ आहे. भविष्यात साखरेचे भाव वाढणारच आहेत. देशाच्या सुधारित अंदाजपत्रकानुसार 291 लाख टन साखरेची गरज आहे. यंदा 281 लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे. जागतिक पातळीवर 21 लाख टनाचा तुटवडा आहे.
अशा परिस्थितीत ऊस दराच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटल्यानंतर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस दराबाबत योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, शेतकर्‍यांच्या लुटीचा फंडा त्यांनी अवलंबल्याने आम्ही आंदोलन गतिमान करणार आहोत.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, भागवत जाधव, संदीप राजोबा, संजय बेले, आप्पासाहेब पाटील, जगन्नाथ भोसले, अ‍ॅड. एस. यु. संदे, बाबासाहेब सांद्रे, शिवाजी पाटील, राम पाटील, संतोष शेळके, अनिल काळे, प्रभाकर पाटील, रविंद्र दुकाने, भुषण वाकळे, वैभव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ऊस आंदोलनामध्ये गाड्यांचे टायर फोडले तर गुन्हे दाखल करण्यात पोलिसांची तत्परता दिसली. आंदोलनादरम्यान आम्ही तब्बल साखरेची वाहतूक करणारे 60 हून अधिक ट्रक आडवले. तेंव्हा मात्र सोयीस्करपणे गुन्हे दाखल झाले नाहीत. यामागे गौडबंगाल काय? शेतकर्‍यांची लूट करून काटा मारलेली अतिरिक्त साखर वाहतूक असल्याने गुन्हे दाखल झाले नाहीत, असा दावा माजी खा. राजू शेट्टी यांनी केला.
माजी खा. राजू शेट्टी

COMMENTS