Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द केल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक

मुंबई : मुंबई विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकी

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेत किर-किर; भाजपमध्ये उकळ्या
जिल्हा भाजपा कडून राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
शेतकर्‍यांना 25%  टक्के अग्रीम पिक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी-अनिल जगताप

मुंबई : मुंबई विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाने अचानकपणे गुरुवारी रात्री उशीरा परिपत्रक काढल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर विद्यापीठाने रातोरात निवडणुकीला स्थगिती दिल्याचे परिपत्रक काढले, मात्र शासनाच्या पत्राच्या संदर्भाव्यतिरिक्त या परिपत्रकात निवडणुकीला स्थगिती का देण्यात आली? याबाबत कोणतेही ठोस कारण देण्यात आले नसल्यामुळे थेट सत्ताधार्‍यांनी राजकीय हस्तक्षेप केल्याची चर्चा रंगली आहे. मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटाची युवा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मोठ्या प्रमाणात पदवीधरांची मतदार म्हणून नोंदणी करून घेतली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार होता. नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील पाच आणि राखीव प्रवर्गातील पाच अशा एकूण दहा जागांसाठी 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होता. मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक स्थगित झाल्यानंतर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, ‘मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणुका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीसाठी प्रचंड घातक आहे. निषेध!’ तर मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील नोंदणीकृत पदवीधर गटाच्या 10 पैकी 10 जागा लढवून त्या जिंकण्याचा निर्धार करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, ‘सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत. हे हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. दरम्यान मिंधे सरकारला त्यांचा पराभव आणि जवळपास 12 लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांचा कौल आपल्या विरुद्ध जाणार आणि जनतेमध्ये शासनाच्या प्रतिमेचा बट्ट्याबोळ होणार या भितीने शासनाने ही निवडणूक स्थगित केली आहे. अखेर ‘राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले’ त्याचा युवा सेनेचे सर्व माजी अधिसभा सदस्य तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे  प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी म्हटले आहे.

राजकीय पोळी कोणी भाजू नये ः सुधाकर तांबोळी – विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन आणि निकाल जाहीर करण्यापाठोपाठ अधिसभा निवडणुकीतही मुंबई विद्यापीठ सपशेल अपयशी ठरले आहे. विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी असते, या ठिकाणी कोणी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून सत्ताधार्‍यांनी ही निवडणूक पुढे ढकलली आहे. तर आगामी काळात आम्ही जे परिपत्रक काढू ते विद्यार्थी व पालकवर्गाला मान्य करावे लागेल, असा संदेश मुंबई विद्यापीठाने अधिसभा निवडणुकीसंदर्भात परिपत्रक काढून दिला आहे. शासन आणि विद्यापीठाची वाटचाल ही विकासाकडे नाही तर भकास होण्याच्या मार्गावर चालली असल्याची टीका मनसेच्या सुधाकर तांबोळी यांनी केली आहे.

COMMENTS