नवी दिल्ली : लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई केंद्र सरकारने रद्द केली अ

नवी दिल्ली : लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई केंद्र सरकारने रद्द केली असून त्यांची लवकरच कारागृहातून सुटका होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. लडाखमध्ये शांतता, स्थैर्य आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
वांगचुक यांना गेल्या वर्षी 26 सप्टेंबर 2025 रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्यापूर्वी 24 सप्टेंबर रोजी लेह येथे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकार्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना राजस्थानमधील जोधपूर केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले होते. सुमारे 170 दिवसांनंतर त्यांची सुटका होणार आहे. लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश करावा, या मागण्यांसाठी लेहमध्ये आंदोलन झाले होते. त्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. या घटनेत हिंसा भडकवल्याचा आरोप ठेवत प्रशासनाने वांगचुक यांना ताब्यात घेतले होते. गृह मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, लडाखमधील विविध समुदायांच्या नेत्यांशी सरकार सातत्याने संवाद साधत आहे. तेथील लोकांच्या अपेक्षा आणि चिंता लक्षात घेऊन समाधानाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र वारंवार होणार्या बंद आणि आंदोलनांमुळे पर्यटन, शिक्षण, व्यापार तसेच रोजगाराच्या संधींवर विपरीत परिणाम होत असल्याची नोंद सरकारने केली आहे. लडाखमधील सामाजिक व आर्थिक घडी पुन्हा स्थिर करण्यासाठी तसेच सर्व घटकांशी रचनात्मक संवाद वाढवण्यासाठी वांगचुक यांची कोठडी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सीमावर्ती प्रदेशाच्या सुरक्षिततेबाबत सरकार कटिबद्ध असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, वांगचुक यांच्या अटकेविरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी येत्या काही दिवसांत होणार होती. मात्र त्यापूर्वीच सरकारने कोठडी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय होते नेमके आरोप ?
लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा देण्याच्या मागणीवरून गेल्या वर्षी लेह येथे आंदोलन झाले होते. त्या वेळी हिंसाचार घडल्याचा आरोप ठेवत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले. सुमारे 170 दिवसांनंतर केंद्र सरकारने त्यांची कोठडी रद्द करत सुटकेचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS