Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेणे विठ्ठलमात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥

कीर्तनकारांनी केले लोकमंथनच्या भूमिकेचे कौतुक

महाराष्ट्राचा साधू-संतांची भूमी म्हणून गुणगौरव आणि या गुणगौरवात संत वाडःमयाचा महिमा अपार आहे. संतांनी निर्माण केलेले अवीट असे वाड्ःमय आणि त्या वि

यशोधन कार्यालयाकडून काकडवाडीतील आदिवासी कुटुंबास मदत
पर्यटन विकास आराखड्यात कोपरगावला प्राधान्य द्या
अहमदनगर शहरातील विकास आराखडा आणि ओढ्या-नाल्यांचा प्रश्‍न

महाराष्ट्राचा साधू-संतांची भूमी म्हणून गुणगौरव आणि या गुणगौरवात संत वाडःमयाचा महिमा अपार आहे. संतांनी निर्माण केलेले अवीट असे वाड्ःमय आणि त्या विचारांवर मार्गक्रमण करीत असलेल्या वारकरी संप्रदायाचे विचार घरात-घरात पोहचविण्याचे कष्ट उपसणारी कीर्तनकार, प्रवचनकार महाराजांचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. त्यांच्या या नित्य कार्यामुळे प्रत्येकजण अभिमानाने म्हणतो चंद्र-सूर्य असेपर्यंत वारकरी संप्रदाय टिकणार ते सत्यच आहे. समाजाला शिस्तबद्ध आणि स्वयंशिस्तीचे धडे देणार्‍या कीर्तनकार मंडळीत बोटावर मोजण्याइतपत मंडळींचा उन्माद संप्रदायासाठी क्लेषदायी आहे. मात्र वारकरी संप्रदायाच्या छायेत वावरुन व्याभिचाराचा उच्छाद मांडणार्‍या आणि संप्रदाय बदनाम करु पाहणार्‍या स्वयंघोषीत मदमस्त महाराजांना अंकुश लावण्यासाठी वारकरी संप्रदयातील ज्येष्ठ अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळींनी एकत्र येऊन कुप्रवृत्तीला आळा बसविण्याची वर्तमानात गरज आहे.
       अहिंसेचा पूजारी असलेल्या संप्रदायात कीर्तनकार महाराज म्हणून मिरवणार्‍या काही शेफारलेल्या विकृतींच्या ज्या हातात विणा शोभत होत्या, त्याच हातात शस्र घेऊन खून करण्याचे धाडस आले कुठुन? हे मुळीच संप्रदायासाठी शोभणीय नाही. कामूक झालेल्यांनी व्याभिचारालाही मोकळीक दिली असली तरी वारकरी संप्रदाय या वृत्तीला कदापीही माफ करणार नाही. समाजातील जाणत्यांनी अशा विकृतींना थारा तर देऊ नयेच पण कदापीही माफ करु नये.
   जेणे विठ्ठलमात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ अशे असेल तर त्या विचारांचे व्यासपीठ चालवणार्‍यांनी त्याचे पालन करायलाच हवे. वारकरी संप्रदयाला मार्गदर्शन करण्याइतपत आम्ही इतके मोठे नाही, परंतु समाजमनाचा वेध घेऊन प्रकट झालेल्या भावनांचा आदर करुन त्या अक्षररुपात समाजासमोर मांडणे हे आमचे कर्तव्य समजून 7 एप्रिल रोजी दैनिक लोकमंथनने बिदागी मिळते भारी कीर्तनकार बनले व्यभिचारी या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध केला. त्या संदर्भात वारकरी संप्रदयातील नामांकीत कीर्तनकारांनी फोन करुन अभिनंदन केले. सत्य परखड स्वरुपात मांडल्याबद्दल कौतुक करुन वारकरी संप्रदाय आणि कीर्तनकारांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याच्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या. त्यात ह.भ.प.डॉ.जलाल महाराज सय्यद निफाड, ज्ञानेश्‍वर महाराज तांबे नेवासा, शांताराम महाराज दुसाणे नाशिक, अशोक महाराज घुमरे सिन्नर आदींनी अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्राची भक्तीनिष्ठा असलेली तीर्थक्षेत्र आणि तेथील संत वाड्ःमयावर चालत असलेली कीर्तन परंपरा यात पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण आदी ठिकाणच्या विश्‍वस्तांनी तथा ज्येष्ठ महाराजांनी, संत साहित्य अभ्यासकांनी एकत्र येऊन कीर्तनसेवेतील सेवा जाऊन जिथे उद्योग शब्द येऊ पाहत आहे तो खोडून, हरिदास म्हणून वारकरी संप्रदायाच्या छायेत राहुन दुष्कृत्य करणार्‍यांवर निर्बंध लादण्याची ज्येष्ठांवर सध्यातरी जबाबदारी आहे. समाजप्रबोधन करत असताना कीर्तनकार कौटुंबिक चुटकुले सांगुन समाजाची चांगलीच इज्जत काढतात. हल्ली कथेत भक्तीचा महिमा वर्णन करताना महिलांनाही उभे राहुन नाचण्याचे आवाहनही केले जाते. तरी समाजही त्या विचारांचा पाईक समजून सर्वकाही निमुटपणाने करतो ऐकत राहतो, कुणीही कुठल्याही महाराजांना प्रतिप्रश्‍नही करत नाही आणि यापुढेही करणार नाही. महाराजांप्रती इतका आदर समाज दाखवतो असे असताना देवर्षी नारदांच्या गादीवर उभे राहुन नको ते घाणेरडे कृत्य काही विकृतींकडून होत असेल तर त्यांच्याबद्दल या संप्रदायांतील जेष्ठ नामांकीत मंडळी बोलण्याचे धाडस करायलाच हवे. जर ते धाडस करणार नसेल तर नकळत चारित्यसंपन्न महाराज मंडळीवरही शिंतोडे उडविण्यास समाजाला मोकळीक सापडेल आणि त्यांचेकडेही लोक कुचेष्ठेने बघतील. बरीचशी कीर्तनकार महाराज मंडळी प्रपंचिक आहेत, बिदागी घेण्याबद्दल कुणाची तक्रार नाही. महाराज ठरविण्यासही आता मध्यस्थ आले आहे ते हि त्यांचा हिस्सा ठेऊन बोलतात, हीदेखील समाजभावना झालेली आहे. येण्या जाण्याच्या खर्चासह सर्वांसाठी माफक बिदागी ठरवुन दिली तर जो पैशांवर लहान मोठा महाराज ठरतो हा भेदभाव राहणार नाही. शेवटी कुणीही असेल तरी तो संतांचा महिमा आणि पांडूरंगाचेच गुणगाण करणार आहे. शेवटी वारकरी संप्रदाय सर्वांचेच श्रद्धास्थान आहे.संताची शिकवणीचा प्रत्येकाला आदर आहे.फक्त एवढेच की संत साहित्याचा आधार घेऊन त्यांच्या नावाने जीवनप्रवास करणार्‍यांनी संत वचनांचा शिकवणूकीचा अनादर होऊ देऊ नये इतकेच.

COMMENTS