शिवसेनेला हादरे न संपणारे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेला हादरे न संपणारे

पक्षीय राजकारणात बंडखोरी आणि पक्षांतर बहुधा सर्वच पक्षाला नवीन नाही. मात्र या हादर्‍यातून पक्षाला जाणारे तडे जर मोठे असेल, आणि त्यातून पक्षाचे अस्तित

उदय सामंतांवरील हल्ल्याने राजकीय वातावरण तापले
निवडणूक झाल्यावर पुण्यात शिवसेनेचा विजयी मेळावा घेणार… संजय राऊत
शिवसेनेचे दोन बडे नेते काँग्रेसमध्येl LokNews24

पक्षीय राजकारणात बंडखोरी आणि पक्षांतर बहुधा सर्वच पक्षाला नवीन नाही. मात्र या हादर्‍यातून पक्षाला जाणारे तडे जर मोठे असेल, आणि त्यातून पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येत असेल तर पक्षनेतृत्वाने आपल्या पक्षात आणि नेतृत्वात महत्वपूर्ण बदल करण्याची गरज असते. मात्र जर पक्षप्रमुख त्यात बदल करणार नसतील, तर पक्ष रसातळाला जातो, त्याचे अस्तित्वच संपुष्टात येते की काय, अशी भीती निर्माण होते. आज शिवसेनेची देखील हीच अवस्था झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला सातत्याने हादरे बसतांना दिसून येत आहे. मराठी माणसांसाठी आणि कडव्या हिंदूत्वाचा कैवार घेणार पक्ष म्हणून शिवसेनेकडे बघितले जाते. मात्र शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसचा हात हातात धरला, आणि शिवसेनेची वाताहत, पीछेहाट होण्यास सुरुवात झाली. आजमितीस शिवसेनेतील 40 पेक्षा अधिक आमदार फुटून बाहेर पडले आहेत. मात्र शिवसेनेवरील संकट अजून थांबलेले नाही. शिवसेनेतील विद्यमान 12 खासदार बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. तसा दावाच शिंदे गटाचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. 12 विद्यमान आणि 22 माजी आमदार आमच्या सोबत येण्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेला बसणारे हादरे साधे नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत अनेक धक्के, पराभव, आणि बंड पचवले आहे. मात्र शिंदे गटाने केलेली बंडखोरी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी बंडखोरी आहे. शिंदे गटाने केलेली ही बंडखोरीच नव्हे तर शिवसेनेच्या अस्तित्वाला मोठा धक्का देणारी आहे. शिवसेना नेमकी कुणाची, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आमच्याकडे बहुमत असल्यामुळे आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची असा सवाल, यानिमित्ताने उपस्थित होत आहे. बंडखोर आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय 11 जुलै रोजी देणारच आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. कारण या याचिकेमुळे पक्षांतर बंदी कायद्याला एक प्रकारे आव्हानच निर्माण केले आहे. त्यामुळे बंडखोर पात्र-की अपात्र ठरतो, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. शिंदे गटातील आमदारांनीच बंड केले नाही, तर शिवसेनेतील विद्यमान खासदार देखील बंडाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आणि संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटासोबत म्हणजेच भाजपसोबत जाऊ शकतात. असे झाले तर शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदे तरी मिळू शकतात. तसेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला काही दिवस राहिले असतांनाच, शिवसेनेने लोकसभेतील आपला प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी केली असून, त्या जागी राजन विचारे यांची निवड केली आहे. शिंदे गट शिवसेनेला लोकसभेत देखील हादरे देण्यासाठी इच्छूक असल्याचे या कृतीतून दिसून येत आहे. शिवसेना पक्ष पुन्हा फुटीच्या उंबरटयावर असून, शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना पक्षात अनेक महत्वपूर्ण फेरबदल करावे लागणार आहे. सामान्य शिवसैनिकाला पक्षप्रमुख म्हणून भेटण्यासाठी कुण्या सोम्या-गोम्याची परवानगी घेण्याची गरज भासू नये, यासाठी उद्धव ठाकरे यांना लोकल व्हावे लागेल. आपल्या कार्यकर्त्यांच्या, आमदारांच्या समस्या जाणून त्यांना पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध राहावे लागणार आहे, तरच शिवसेना कात टाकू शकते. अन्यथा शिवसेनेसमोर मोठे संकट निर्माण झाले असून, त्यातून मार्ग काढणे भविष्यात कठिण होऊ शकते. तूर्तास इतकेच.

COMMENTS