Homeताज्या बातम्यासंपादकीय

ओबीसींना सेवक ठरवणारे शर्मा, बिंद्रा सामाजिक गुन्हेगारच !

संविधानानुसार सत्तेच्या पदावर आल्यानंतर जातीय माज कसा चढतो, याचे एक उत्तम उदाहरण पुन्हा एकदा आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वास शर्मा यांनी प्रकट क

संविधानिक चौकटीच्या उद्ध्वस्तीचा मार्ग ! 
सार्वजनिक – खाजगी क्षेत्रासाठी मोदींचा रोडमॅप !
गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा अपरिहार्यच!

संविधानानुसार सत्तेच्या पदावर आल्यानंतर जातीय माज कसा चढतो, याचे एक उत्तम उदाहरण पुन्हा एकदा आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वास शर्मा यांनी प्रकट केले आहे. त्यांनी काही दिवसापूर्वीच एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून ओबीसी म्हणजे शूद्र हे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणे हाच, त्यांचा धर्म असल्याचे ट्विट करून  केवळ जातीयवादी भूमिका घेतली नाही; तर भारतीय संविधानाला हरताळ फासणारी आणि संविधानाचे उल्लंघन करणारी पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावरून ताबडतोब बरखास्त करण्यात यावे, हीच मागणी देशातला तमाम ओबीसी आता  करणार. काही दिवसांपूर्वी विवेक बिंद्रा नावाच्या एका बिलंदराने देखील अशाच प्रकारचे वक्तव्य, एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिली होती.  त्यात त्याने शूद्र म्हणजे ओबीसी हे फक्त चांगली सेवा करू शकतात, अशा शब्दात व्यक्त होऊन, त्याच्या जातीय मानसिकतेच्या चिळकांड्याच त्याने एक प्रकारे उडवल्या! सध्या देशात अशा प्रकारचे वक्तव्य वाढत असले तरी, केवळ निषेधाच्या प्रक्रियेवर आता थांबावे लागणार नाही; कारण, अतिशय जुलमी जातीवादी भूमिका जे सत्ताधारी घेत आहेत त्यांना संविधानाच्या भूमिकेनुसार आता बडतर्फ करण्याची गरज निर्माण झाली आहे.  देशाचे पंतप्रधान जे ओबीसी समूहातून आहेत, ओबीसी याचा अर्थ शूद्र आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली दहा वर्ष देशाची सत्ता सांभाळल्यानंतर अशा प्रकारची जी वक्तव्य येत आहेत, त्याचा केवळ निषेध करून चालणार नाही तर, नरेंद्र मोदी यांनी अशा जातीयवादी भूमिका घेणाऱ्यांना सत्तेतून बडतर्फ करणे गरजेचं झाले आहे. एका बाजूला ओबीसी समुदायाची जातनिहाय जनगणनेची मागणी सुरू असताना, दुसऱ्या बाजूला त्या समुदायाशी अतिशय जातीयवादी मानसिकतेतून व्यवहार करण्याची मानसिकता वाढीस लागली आहे; ही मानसिकता वेळीच कुचलून काढण्याची भूमिका आता देशाचे ओबीसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घ्यावी लागेल. अन्यथा, या देशातील उच्चवर्णीयांना जो सत्ताकारणाचा माज इतिहास काळात आलेला होता, तो पुन्हा आता ते गरळ ओकल्यासारखा बाहेर फेकत आहेत. त्यामुळे केवळ भारतीय संविधानच नव्हे, तर, या देशातल्या संविधानिक आणि सर्वोच्च स्थानावर असलेल्या व्यक्तींचाही अपमान केला जातो आहे. म्हणून अशा मानसिकतेला  ठेचाळण्याची गरज ऐतिहासिक म्हणून आपल्यासमोर उभी राहिली आहे. पुरानकालीन या मानसिकता भारतीय समाजव्यवस्थेला मागे नेण्याचाच प्रयत्न करित आहेत. आधुनिक समाजजीवनाची मूल्य भारतातील शोषित समाजाला सर्वात आधी समजली आहेत; तशी ती त्यांची गरज होती. आपले हक्क जाणून असलेल्या समुदायाला पुन्हा त्याच अवस्थेत नेण्याची कोणी वल्गना करित असेल तर कायद्याने त्याचा बंदोबस्त करावाच लागेल. इतिहासातील शूद्र म्हणजे आजच्या ओबीसी समुदायाला खालच्या पातळीवर संबोधण्याचा कुणी प्रयत्न करित असेल तर कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी. तसा कायदा आज उपलब्ध नसेल, तर , कायदा निर्माण करण्याची मागणी शूद्र समाज केल्याशिवाय राहणार नाही. शूद्र म्हणजे ओबींसीं समुदायातीलच व्यक्ती आज देशाच्या पंतप्रधान पदावर असल्याने याविषयावर गंभीर दखल ते घेतील याचा आम्हाला विश्वास आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा असो वा विवेक बिंद्रा यांना या सामाजिक गुन्ह्याचे आरोपी मानले जाऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल याचा आम्हाला विश्वास आहे.

COMMENTS