शरद पवारांचे…राष्ट्रवादी पुन्हा ; सत्तांतरानंतर रविवारी नगरला पहिला कार्यकर्ता मेळावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांचे…राष्ट्रवादी पुन्हा ; सत्तांतरानंतर रविवारी नगरला पहिला कार्यकर्ता मेळावा

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर व नवे शिंदेशाही-भाजप सरकार सत्तारूढ झाल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी

Sangamner : रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांची लूट केल्यास परवाना रद्द करणार (Video)
महात्मा बसवेश्‍वर आणि कर्मवीर अण्णा यांचे विचार रुजले पाहिजेत ः प्राचार्य शेळके
धरणांतील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर व नवे शिंदेशाही-भाजप सरकार सत्तारूढ झाल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पुन्हा एकदा दंड थोपटून मैदानात उतरण्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादी पुन्हा…म्हणत राज्यातील त्यांच्या कार्यकर्ता मेळावा उपक्रमांची सुरुवात येत्या रविवारी (10 जुलै) आषाढी एकादशीच्या दिवशी नगरमधून होणार आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहात त्यांचा मेळावा होणार आहे.
अडीच वर्षांपूर्वी 2019मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे गाणे चांगलेच गाजले होते. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातुन घुमला.. राष्ट्रवादी पुन्हा…या त्या गाजलेल्या गाण्याचे बोल पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवारच आता पुन्हा एकदा उभे राहिले आहेत. अर्थात राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले व नवे सरकार सत्तेवर आल्याने पवारांनी राज्यभरातील समर्थकांना एकवटण्यासाठी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे. राज्यभरात ते मेळावे घेणार असून, त्याची सुरुवात नगरपासून ते करणार आहेत. गुरुवारी (7 जुलै) ते मुंबईहून पुण्याला आले असून, तेथून आज शुक्रवारी (8 जुलै) बारामतीला जाणार आहेत. उद्या शनिवारी (9 जुलै) ते बारामतीलाच थांबणार असून, रविवारी (10 जुलै) सकाळी 9 वाजता नगरला येण्यासाठी निघणार आहेत. या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहात ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 ते 2 या वेळेत प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा करून औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. रविवारी सायंकाळी व सोमवारी दिवसभर त्यांचे औरंगाबाद शहरात कार्यक्रम आहेत. दरम्यान, नगरला रविवारी होणारा पवारांचा मेळावा आधी राष्ट्रवादी भवनात होणार होता. मात्र, आता तो सहकार सभागृहात होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. या मेळाव्यात पक्षाचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मध्यावधीची तयारी सुरू ?
महाविकास आघाडी सरकारमधील मुख्य सत्ताधारी शिवसेनेमध्ये फूट पडून त्यांच्या 55 आमदारांपैकी तब्बल 40 आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागले आहे. 2019मध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवून व राष्ट्रीय काँग्रेसला समवेत घेऊन पवारांनीच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणले होते. मात्र, शिवसेनेत फूट पडून हे सरकार पडले. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार यांनी सहा महिन्यात शिंदेशाही व भाजपचे सरकार कोसळेल व राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत करून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या निवडणुकांच्यादृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, त्यांनी स्वतः आता पक्षाची निवडणूक तयारी सुरू करण्यादृष्टीने पुढाकार घेतला आहे व राज्यभरात दौरे करण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या या दौर्‍यांना सुरुवात अहमदनगर जिल्ह्यापासून होणार आहे. त्यामुळे रविवारी नगरला होणार्‍या मेळाव्यात ते काय बोलतात व समर्थकांना काय मंत्र देतात, याची उत्सुकता वाढली आहे.

पहिलेच जाहीर भाष्य होणार
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यावर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधून प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, आता समर्थकांचा पहिलाच मेळावा नगरला घेण्याच्यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकार व नवे सरकार या विषयावर जाहीर भाष्य होण्याची शक्यता आहे. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्‍वासदर्शक ठराव संमत झाल्यावर शरद पवार यांची आवर्जून भेट घेतली होती. त्यावर तसेच शिवसेनेत सध्या खरी शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची, यावरून वाद सुरू आहेत. त्यामुळे याबाबत पवार काही भाष्य करतात का, याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे.

COMMENTS