
रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना रंगणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात नाराजी नाट्य समोर आले आले आहे. शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकार्यांनी राजीनामे दिले आहेत. माजी आमदार संतोष चौधरी हे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ, वरणगाव, रावेर, यावल या तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. यामुळे रावेरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी हे देखील नाराज असून ते अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता संतोष चौधरी नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. श्रीराम पाटील जळगाव जिल्ह्यातील एक प्रतिष्ठीत उद्योजक असून त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेत रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना मराठा समाज भूषण, उद्योग भूषण असे पुरस्कार मिळाले आहेत.
COMMENTS