Homeताज्या बातम्या

तामसा ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. ५ मध्ये भीषण पाणीटंचाई; हंडे घेऊन रात्रभर नागरिकांची वणवण, आंदोलनाचा इशारा

नांदेड : तामसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक ५ मध्ये सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी

“निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे” – निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे; नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्देश
तुकाराम मुंडे नांदेडला आल्याच्या अफवेने खळबळ; कारवाईच्या भीतीने शहरातील पानटपऱ्या बंद, गुटखा विक्रेत्यांचा पोबारा
मनपा शाळेमध्ये वाचक विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याचा सृजनशील उपक्रम
news about water problem create the soygavhan

नांदेड : तामसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक ५ मध्ये सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीकडून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना रात्री-अपरात्री एकाच बोरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे.

तामसा शहरातील सर्वात मोठा वार्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वार्डची लोकसंख्या सुमारे पाच ते सात हजारांच्या दरम्यान आहे. एवढी मोठी लोकसंख्या असतानाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नागरिकांना घरगुती वापरासाठी तसेच पिण्यासाठी आवश्यक असलेले पाणी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक कार्यरत असून गावाचा कारभार संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे आहे. मात्र, नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एकाच बोरवेलवर संपूर्ण परिसरातील नागरिकांची गर्दी होत असून पाणी भरण्यासाठी तासन्तास रांगा लागत आहेत. रात्री उशिरापर्यंत महिला, पुरुष व लहान मुले हातात बादल्या, कॅन आणि हंडे घेऊन पाण्याची प्रतीक्षा करत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यालगत पाणी भरताना अपघाताचा धोका कमालीचा वाढला असून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून पाणी भरावे लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने अतिरिक्त टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची, बंद किंवा नादुरुस्त जलयोजना दुरुस्त करण्याची तसेच वार्ड क्र. ५ साठी स्वतंत्र आणि शाश्वत पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

COMMENTS