Homeताज्या बातम्यासंपादकीय

वेगळा आणि विरळा अभिवादक! 

महाराष्ट्र हे राज्य आजही फुले-शाहू-आंबेडकरांची भूमी म्हणून ओळखली जाते. या महाराष्ट्राला घडवणाऱ्या तीन महामानवांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आ

समाजवादी आणि उध्दव ठाकरे !
अबब! बेरोजगारच बेरोजगार !
योगींचा ओबीसी प्लॅन!

महाराष्ट्र हे राज्य आजही फुले-शाहू-आंबेडकरांची भूमी म्हणून ओळखली जाते. या महाराष्ट्राला घडवणाऱ्या तीन महामानवांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिवस. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!! सध्या जगभरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व वाढलं आहे. ऐंशीच्या दशकापूर्वी जगामध्ये भांडवली आणि साम्यवादी अशा दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था आणि विचारव्यवस्था असल्यामुळे, जगाचे दोन महाशक्तींच्या ध्येय धोरणांनी नियंत्रण होत असे. पण, आज हे नियंत्रण पूर्णपणे कोसळले आहे.  जग हे निखळ भांडवलशाहींच्या विळख्यात गेले आहे. अशावेळी भारताबाहेरच्या जगालाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक आणि राजकीय विचार हे प्रेरणास्थानी ठरत आहेत. तर, भारत देशामध्ये त्यांच्या समग्र विचारसरणीला केवळ मोठा अनुयायी वर्गच लाभला नाही, तर त्यांच्या विचारांना अनुसरणात आणणारा प्रचंड मोठा जनसमूह या देशात आहे. या देशातील राजकीय व्यवस्था कोणतीही असो, त्या व्यवस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणे शक्यच नाही! कधीकाळी केवळ ब्राह्मण-बनियांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्षाने ओबीसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की, त्यांनी स्वीकारलेले डॉ. आंबेडकर हे केवळ प्रतीक म्हणून किंवा भावनिक म्हणून आहे; विचारांचा स्वीकार केलेला नाही! परंतु, आम्हाला या आरोपात फार तथ्य वाटत नाही. मोदींच्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जे जे काम त्यांनी हातात घेतले, ते त्यांनी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिल येथे व्हावं म्हणून २०१४ पासूनच त्यांनी या संदर्भात कृती कार्यक्रम हाती घेतला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे आंतरराष्ट्रीय स्मारक, ज्याला इंदू मिल स्मारक म्हणतात हे जवळपास पूर्णत्वास येत आहे. हे स्मारक उभारणं हे नंतरची प्रक्रिया आहे. परंतु, मुळातच इंदू मिल सारख्या एका मिलची अवाढव्य जमीन आणि त्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे राहावं, यासाठी चंद्रकांत भंडारे नावाच्या एका सामान्य माणसाने हाती घेतलेला लढा, याकडे केवळ लढा म्हणून पाहता येत नाही; तर, आपलं समग्र जीवन बदलून टाकणाऱ्या या महामानवाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना जीवनातलं सर्वस्व अर्पण करावं लागलं तरी चालेल, पण, त्या महामानवाच्या प्रति आपण कृतज्ञ राहायला हवं. ती कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी या ध्येयान चंद्रकांत भंडारे यांनी या जमिनीची मागणी भारत सरकारकडे केली.  पाहता पाहता एका व्यक्तीने उभा केलेला हा लढा आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या रूपात लवकरच आपल्यासमोर येईल.  देशभरातूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अभिवादक दाखल होत असतात. हे अभिवादक या ठिकाणी भावना आणि ज्ञान या दोन्हीच्या अनुषंगाने आपलं अभिवादन करत असतात. एका बाजूला चैत्यभूमी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी तासनतास वाट पाहून आपला नंबर आल्यावर ते दर्शन घेतात;  त्यांच्या प्रति असलेली भावनिक कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यानंतर चैत्यभूमीच्या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ज्ञान भांडार म्हणून आलेल्या ग्रंथालयांना ते भेटी देतात. या ठिकाणी सर्वात मोठी काही गोष्ट घडत असेल तर कोट्यावधींच्या ग्रंथांची खरेदी आणि विक्री! आपल्या ज्ञानमार्गाने कृतज्ञता व्यक्त करणारा अनुयायांचा हा पराक्रम जगाच्या पाठीवर निश्चितपणे वेगळा आणि विरळा आहे! माणसाला ज्ञानाची भूक ही कशी असते आणि ती कशी भागवावी, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणून जर पहायचं असेल, तर त्यांनी एकदा नक्कीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला अभिवादक म्हणून भेट द्यायला हवी. समाजातील सामान्यांपासून  तर उच्चभ्रू पर्यंत अगदी ही गोष्ट सहज कळेल!  कदाचित घरातल्या दारिद्र्याला न जुमानता या ठिकाणी हजारो रुपयांची ग्रंथ खरेदी करणारा अनुयायी हा जगातील एकमेवाद्वितीय आहे!

COMMENTS