Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिव भांगे पालकमंत्री भुमरे, आ. शिरसाटांना ठरले भारी

पालकमंत्र्यांचे आदेश डावलत श्रीमती सोनकवडे यांची नियुक्ती

exclusive stamp. exclusive round grunge sign. label मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे सध्या कुणालाच जुमानत नसल्याचे दिसून

विधिमंडळांत बार्टीसह सचिव सुमंत भांगेची ‘पोलखोल’
सचिव भांगे यांचा छ. संभाजीनगरचा दौरा गोपनीय का ?
श्रीमती जयश्री सोनकवडेंसह तीन अधिकार्‍यांवर दखलपात्र गुन्हा दाखल
exclusive stamp. exclusive round grunge sign. label

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे सध्या कुणालाच जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांच्यासह शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख देवीदास पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रादेशिक उपायुक्त म्हणून नेमणुकीसाठी एका अधिकार्‍याच्या नावाची शिफारस केली होती. मात्र सचिव भांगे यांनी विद्यमान पालकमंत्री भुमरे आणि आमदार शिरसाट यांनी केलेल्या शिफारशीला केराची टोपली दाखवत प्रादेशिक उपायुक्त म्हणून श्रीमती जयश्री सोनकवडे यांची नियुक्ती केली आहे.

जयश्री सोनकवडे यांच्या नियुक्तीला अनेकांनी आक्षेप घेतला आहे. या नियुक्तीसाठी सचिव भांगे यांनी 60 लाख रुपये घेतल्याचा थेट आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे हिंगोली जिल्हाध्यक्ष एकनाथ खंदारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे श्रीमती सोनकवडे यांची कारकीर्द अनेक आरोपांनी गाजली आहे. सोनकवडे या छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा समाजकल्याण अधिकारी या पदावर असतांना सौर ऊर्जा या योजनेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर जिल्हा परिषद सदस्य यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच याच पदावर कार्यरत असतांना त्यांनी एका संस्थाचालकाकडून लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्हीही गुन्ह्यासंदर्भात सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. लाच प्रकरणात त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. त्यामुळे पालकमंत्री भुमरे आणि आमदार शिरसाट या जागेवर पारदर्शक, कर्तव्यदक्ष आणि भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप नसलेल्या अधिकार्‍याला या जागेवर आणण्यासाठी इच्छूक असतांना, सचिव सुमंत भांगे मात्र पालकमंत्र्यांच्या निर्देशाला डावलून समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तपदी श्रीमती सोनकवडे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सचिव भांगे यांची सोनकवडे यांच्यावर खास मर्जी कशामुळे आहे ? असा सवाल उपस्थित होत आहे. सोनकवडे यांच्याविरुद्ध अनेक संघटनांनी तक्रारी केल्या असून, त्यांची वादग्रस्त कारकीर्द बघता सचिव भांगे त्यांच्या नावासाठी आग्रही का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक न्याय विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती सोनकवडे विरुध्द कर्मचारी व लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी होत्या व आहेत. त्या छत्रपती संभाजीनगर येथे जि.प.मध्ये कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याबद्दल कारवाई केली होती व त्यांना निलंबित केले होते. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असताना त्यांच्या कार्यालयातील 100 टक्के कर्मचारी त्यांच्या छळास कंटाळून आमरण उपोषणास बसले होते. त्या संचालक वि.जा.भ.ज. कार्यालयात कार्यरत असताना 25 कर्मचारी, अधिकार्‍यांनी त्यांच्याविरुध्द शासनास तक्रारी केल्या होत्या. या सर्व बाबी माहित असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपानजी भुमरे, आमदार संजयजी शिरसाट व शिवसनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख देवीदास पवार यांनी सोनकवडे यांना प्रादेशिक उपायुक्त छत्रपती संभाजीनगर म्हणून नियुक्ती देऊ नये म्हणून आपणास विनंती केली होती. तसेच आस्थापना मंडळानेही त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील नियुक्तीला विरोध केला होता. पण सचिव सुमंत भांगे 60 लाख रुपये घेऊन सर्वांचा विरोध मोडून त्यांची बदली आपणास चुकीची माहिती देऊन करुन घेतली. पालकमंत्री, आमदार जिल्हाप्रमुख सर्व आपले विश्‍वासू सहकारी असतांना त्यांचे न ऐकता सचिव सुमंत भांगेचे ऐकून वादग्रस्त श्रीमती सोनकवडे यांची नियुक्ती केल्याबद्दल जनमाणसात प्रचंड नाराजी आहे व लोकप्रतिनिधींना न जुमानता मी पैशाच्या जोरावर काहीही करु शकतो अशी घमेंड, मुजोरी सचिव भांगेमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ते अनेक बेकायदेशीर कामे करुन सामाजिक न्याय विभागात कोट्यावधीचा भ्रष्टाचार करत आहेत. दर आठवड्याला सचिव सुमंत भांगे हे छत्रपती संभाजीनगर येथे कशासाठी येत आहेत? ते मुख्य सचिवांची परवानगी घेतात का? या सर्व बाबींची सखोल चौकशी करुन सचिव सुमंत भांगे यांचेवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.

आस्थापना मंडळाच्या सदस्यांच्या मतांना केराची टोपली – राज्यात कोणत्याही अधिकार्‍याची एखाद्या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यासाठी आस्थापना मंडळाच्या शिफारशी विचारात घेतल्या जातात. श्रीमती जयश्री सोनकवडे यांची छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक न्याय विभागात प्रादेशिक उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यासाठी आस्थापना मंडळाचा सल्ला घेण्यात आला. यावेळी आस्थापना मंडळाच्या सर्व सदस्यांनी सोनकवडे यांची कारकीर्द वादग्रस्त असून, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत, त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना पकडले आहे, असे असतांना त्यांची नियुक्ती या महत्वाच्या पदावर योग्य नाही. असा पवित्रा घेतला होता. मात्र आस्थापना मंडळाचे अध्यक्ष असलेल्या सचिव भांगे यांनी या मंडळातील सर्व सदस्यांचे मत डावलून श्रीमती सोनकवडे यांना या पदावर नियुक्त केले. आस्थापना मंडळाच्या सदस्यांसह पालकमंत्री, आ. शिरसाट यांचे आदेश देखील डावलण्याचा प्रकार यामुळे समोर आला आहे.

सचिव सुमंत भांगे यांची श्रीमती सोनकवडेंवर ‘विशेष मर्जी’ – सचिव सुमंत भांगे यांनी नेहमीच अधिकारी श्रीमती जयश्री सोनकवडे यांना विशेष अभय दिल्याचे विविध घटनांवरून दिसून येते. विशेष म्हणजे सोनकवडे या सामाजिक न्याय विभागातील सेवांमध्ये कायम होण्यापूर्वीच त्यांच्यावर महत्वाची पदाची जबाबदारी देण्याचा प्रताप सचिव भांगे यांनी केला आहे. सचिव भांगे श्रीमती सोनकवडे यांना अभय का देत आहे ? त्यांची सोनकवडेंवर ‘विशेष मर्जी’ का? असा सवाल विविध संघटनांनी उपस्थित केला आहे.

प्रशासकीय अट्टाहास का? – पुणे येथील भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या पुणे येथील उपसंचालक या पदावर श्रीमती सोनकवडे या कार्यरत होत्या. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक उपायुक्त या पदावर कार्यरत असलेले जलील शेख यांची बदली झाल्यानंतर या विभागाचा अतिरिक्त कार्यभार त्याच विभागातील ज्येष्ठ अधिकार्‍याकडे सोपवता आला असता. किंवा त्या विभागातील उपायुक्त दाणी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवता आला असता. मात्र नियम डावलून तब्बल अडीचशे किलोमीटर दूर असलेल्या म्हणजेच पुणे येथील भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या पुणे येथील उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती सोनकवडे यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. तब्बल 29 नोव्हेंबर 2022 पासून ते 01 मार्च 2023 पर्यंत सोनकवडे यांच्याकडे हा कार्यभार होता. त्यामुळे त्यांना 20 टक्के अलावून्स द्यावा लागला, तसेच यामुळे राज्य सरकारला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला.

श्रीमती सोनकवडे यांनी आम्हाला कोर्टात खेचण्याआधी आपली कारकीर्द तपासावी – सामाजिक न्याय विभागातील भ्रष्टाचार आणि गैरकारभार संपवून आंबेडकरी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा विडाच दैनिक लोकमंथनने उचलला आहे. याच कारणामुळे श्रीमती सोनकवडे यांनी आम्हाला सायंकाळी 6ः51 मिनिटांनी कॉल करून, कोर्टात खेचण्याची धमकी दिली आहे. यापुढेही अशा धमक्या येवू शकतात, याची आम्ही जाणीव असून, अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नसून, आमचा हा लढा असाच सुरू राहणार आहे. आम्हाला कोर्टात खेचण्याआधी श्रीमती सोनकवडे यांनी आपली कारकीर्द तपासावी. आम्ही सामाजिक न्याय विभागातील भ्रष्टाचाराचे लक्तरे समाजासमोर मांडत असतांना, आमच्याकडे उपलब्ध पुराव्याच्या आधारे त्याची सत्यता तपासूनच आम्ही यासंदर्भातील वार्तांकन करत आहोत, त्यामुळे आम्हाला कोर्टात खेचण्याचा इशारा देणार्‍यांना आम्ही भीक घालत नाही, तूर्तास इतकेच.  

COMMENTS