Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रधानमंत्री सूर्यघर (रुफटॉप) योजनेचा वीजग्राहकांनी लाभ घ्यावा- मुख्य अभियंता दीपक कुमठेकर

नाशिक मंडळातील घरगुती वर्गवारीतील अर्जदार ग्राहकांशी संवाद

नाशिक: मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री - सूर्यघर मोफत वीज योजने’त तीन किलोवॅट क्षमतेच

पुणतांबा ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढत
शहर काँग्रेसने रस्ते दुरुस्तीसाठी दिला मनपाला महिन्याचा अवधी ; व्यापार्‍यांसह आयुक्तांशी केली चर्चा
वर्धा अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू ; भाजप आमदार पुत्राचाही समावेश

नाशिक: मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री – सूर्यघर मोफत वीज योजने’त तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार असून वीज ग्राहकांनी या योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा, सोबतच दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या निर्देशानुसार ‘प्रधानमंत्री – सूर्यघर मोफत वीज या योजनेअंतर्गत नाशिक मंडळातर्गत घरगुती वर्गवारीतील वीज ग्राहकांशी संवाद साधण्याकरिता  यामध्ये येणाऱ्या अडचणी, तक्रारी व शंका दूर करण्यासाठी आज महापारेषणच्या प्रशासकीय कार्यालय येथील सभागृहात संवाद मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ग्राहकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची वेगाने अंमलबजावणी करण्याची सूचना महावितरणला केली आहे. घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॅटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तर अधिक एक किलोवॅट म्हणजे तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकाला एका किलोवॅटला अठरा हजार रुपये अधिकची सबसिडी मिळेल. अर्थात एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळेल. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे. दि. १३ फेब्रुवारी २०२४ नंतर रूफ टॉप सोलरसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळेल.

महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केलेली असून एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविता याव्यात यासाठी महावितरणने यापूर्वीच यशस्वी प्रयत्न केले आहेत. राज्यात मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत रुफ टॉप सोलर सिस्टिम बसविलेल्या वीज ग्राहकांची संख्या १,२७,६४६ झाली असून त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता १९०७ मेगावॅट झाली आहे.

यावेळी सदर योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती उपकार्यकारी अभियंता वंदना पेटकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी ग्राहकांनी व एजन्सी प्रतिनिधी यांनी विचारलेले विविध प्रश्न, तक्रारी व शंकांचे निरसन मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले. ग्राहकांना योजनेविषयक संपूर्ण माहिती, सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल ग्राहकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले तर सूत्रसंचालन समीर वडजे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी केले. यावेळी अधिक्षक अभियंता जगदीश इंगळे, कार्यकारी अभियंते माणिकलाल तपासे, राजाराम डोंगरे, केशव काळूमाळी व अनिल नागरे यांच्यासह नाशिक मंडळातील उपविभागीय अभियंते, एजन्सी यांचे प्रतिनिधी व बहुसंख्येने ग्राहक उपस्थित होते.

COMMENTS