Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निजामाला भाडेपट्ट्याने दिलेला वुडलॉन बंगला सील

महाबळेश्‍वर / प्रतिनिधी : हैदराबाद येथील निजामाला भाडेपट्ट्याने दिलेला 15 एकर 15 गुंठे भूखंड व त्यावर बांधलेला आलिशान वुडलॉन हा बंगला जिल्हाधिक

फायद्यासाठी पक्ष बदलणार्‍या नाईकांना जनता थारा देणार नाही : सम्राट महाडीक
विशाळगड वाचविण्यासाठी विशाल आंदोलनाची वेळ : खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर
सातारा जिल्ह्यात आरटीई अंतर्गत 1,483 विद्यार्थ्यांचे प्रवेश

महाबळेश्‍वर / प्रतिनिधी : हैदराबाद येथील निजामाला भाडेपट्ट्याने दिलेला 15 एकर 15 गुंठे भूखंड व त्यावर बांधलेला आलिशान वुडलॉन हा बंगला जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार महाबळेश्‍वर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी पोलीस बंदोबस्तात सील केला. या मिळकतीची बाजारभावानुसार किंमत 200 ते 300 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे.
महाबळेश्‍वर शहरानजीक वुडलॉन ही मिळकत असून, या मिळकतीवरून वाद सुरू आहेत. दोन गटांमध्ये बरेच वाद झाल्याने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना वुडलॉन ही मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार तहसीलदारांनी कारवाई केली. या कारवाईवेळी वाई तहसीलदार रणजितसिंह भोसले देखील उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तात कारवाई पथक सकाळी 10 वाजता वुडलॉन बंगल्यावर पोहोचले. येथील मुख्य बंगल्याशेजारी असलेल्या स्टाफ क्वार्टरमध्ये गेली अनेक वर्षे माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व त्यांचे पती माजी नगरसेवक कुमार शिंदे राहात आहेत. तहसीलदार चौधरी-पाटील यांनी त्यांना कारवाईबाबत माहिती देऊन तुमचे सर्व साहित्य बाहेर काढून बंगला सोडण्यास सांगितले. सकाळी दहानंतर शिंदे कुटुंबीयांनी आपले सर्व साहित्य बाहेर काढण्यास प्रारंभ केला. साधारण सायंकाळी पाच वाजेपर्यंत साहित्य बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्यानंतर मुख्य बंगल्याच्या सर्व खोल्यांना तहसिलदार यांच्या समक्ष सील ठोकण्यात आले. सर्वात शेवटी या बंगल्याची दोन्ही गेट देखील पथकाने सील केली. या बंगल्यात कोणाही खाजगी व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई असल्याचे फलक शासनाच्या वतीने लावण्यात आले आहेत.
ब्रिटीशांनी हा भूखंड भाडेपट्ट्याने पारशी वकिलांना दिला होता. सन 1952 मध्ये हिज हायनेस नबाब मीरसाब उस्मान अल्लीखान बहादुर नबाब ऑफ हैद्राबाद यांच्या नावे करण्यात आला. नबाब यांच्याकडे आयकराची मोठी थकबाकी होती. 59 लाख 47 हजार 797 रूपयांच्या आयकर वसुलीसाठी टॅक्स रिकव्हरी ऑफिसर कोल्हापूर यांच्याकडील पत्रानुसार थकबाकीची नोंद मिळकत कार्डावर करण्यात आली. जो पर्यंत ही वसुली होत नाही तोपर्यंत ही मिळकत विक्री करणे, गहाण ठेवणे व कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हैद्राबाद येथील नबाब यांचे वारस म्हणून नबाब मीर बरकत अल्लीखान बहादुर यांचे नाव लावण्यात आले. सन 2003 मध्ये पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मिळकतीवरील सर्व पट्टेदारांची नावे वगळून ही मिळकत शासनजमा केली. सन 2005 मध्ये पुन्हा जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश मागे घेवून पुर्वीप्रमाणे परिस्थिती कायम करण्यात येत आहे, असे आदेश दिले. सन 2016 मध्ये या मिळकतीचे हस्तांतरण झाले व मिळकतीवर डायरेक्टर हर्बल हॉटेल प्रा. लि. तर्फे दिलीप ठक्कर यांचे नाव लावण्यात आले. तेंव्हापासून ही मिळकत वादात होती. ठक्कर व नबाब यांच्यात मिळकतीवरून वाद सुरू झाला. आता भाडेपट्ट्याने दिलेला 15 एकर 15 गुंठे भुखंड व वुडलॉन हा बंगला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सील करण्यात आला.

COMMENTS