संजय राऊतांचा गंभीर आरोप; विमान अपघातावर संशय, संसदेत मुद्दा उचलणारमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक

संजय राऊतांचा गंभीर आरोप; विमान अपघातावर संशय, संसदेत मुद्दा उचलणार
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर गंभीर आरोपांची मालिका सुरू केली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे, असा थेट सवाल उपस्थित करत राऊतांनी या प्रकरणाची तुलना ‘जस्टिस लोहिया’ प्रकरणाशी केली आहे.
राऊत म्हणाले की, अजित पवार स्वगृही परतले असते तर तो भाजपसाठी मोठा राजकीय धक्का ठरला असता. विशेष म्हणजे 15 जानेवारी रोजी अजित पवार यांनी सार्वजनिकरित्या माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांच्या विमानाचा अपघात होणे संशय निर्माण करणारे असल्याचे राऊतांचे म्हणणे आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्नही गंभीर असून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. राऊतांनी अजित पवारांच्या पक्षावरही जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस आता पवार किंवा पाटील यांचा पक्ष राहिलेला नसून तो भाजपच्या नेत्यांच्या प्रभावाखाली गेला आहे, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राची प्रादेशिक ओळख जपणार्या पक्षाला भाजपने संपवले, अशी टीका करत त्यांनी अमित शहा, नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वावर बोट ठेवले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नसेल, तर त्यामागे विश्वासाचा अभाव असू शकतो, असे राऊत म्हणाले. अजित पवार हयात नसताना त्यांच्या नावावर राजकीय भूमिका लादू नयेत, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. आज ते नाहीत, म्हणून त्यांच्या नावावर काहीही सांगणे चुकीचे आहे, असा टोला त्यांनी लगावला. अर्थसंकल्पावर भाष्य करताना राऊतांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक वाटा उचलणार्या महाराष्ट्राला अर्थसंकल्पात नेमके काय मिळाले, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हायस्पीड रेल्वे आणि बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांचा महाराष्ट्रातील सामान्य जनतेला फारसा फायदा नाही, तर मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे संकट गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कागदपत्रे वाचली, देह ओळखू येईनात?
या अपघाताबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न असल्याचे सांगत राऊतांनी शंका व्यक्त केली. विमानात सहा प्रवासी असताना पाच मृतदेहच कसे सापडले? सहावी व्यक्ती कोण होती आणि तिचा ठावठिकाणा काय? सर्व मृतदेह जळून ओळख पटू नये, अशी स्थिती असताना अजित पवारांकडे असलेली कागदपत्रे मात्र सुरक्षित कशी राहिली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या कागदांमध्ये भाजपच्या भ्रष्टाचाराशी संबंधित फाइल होती का, हे तपासले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.

COMMENTS