छत्रपती शाहू महाराज यांनी भारतीय समाजव्यवस्थेला सूक्ष्मपणे समजून घेऊन, ही व्यवस्था बदलण्यासाठी सर्व स्तरावर ठोस प्रयत्न केले. सर्व जात व धर्मासाठ
छत्रपती शाहू महाराज यांनी भारतीय समाजव्यवस्थेला सूक्ष्मपणे समजून घेऊन, ही व्यवस्था बदलण्यासाठी सर्व स्तरावर ठोस प्रयत्न केले. सर्व जात व धर्मासाठी शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून कोल्हापुरात प्रत्येक जात आणि धर्माची बोर्डींग बांधून सुरे केली. यात मराठा बोर्डिंग प्रमाणेच मुस्लिम बोर्डींगही त्यांनी निर्माण करून दिली. छत्रपती शाहू महाराजांना आजही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आदराचे स्थान आहे. परंतु, आज त्यांचे वारस असलेले संभाजीराजे भोसले यांनी मात्र, स्वतंत्र राजकीय भूमिकेच्या नावावर जातीयवाद्यांच्या तालावरच वागायचं ठरवलं, असं दिसतं. काल त्यांनी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळाला भेट देऊन आपण किती पक्षपाती आहोत, हे दाखवून दिले. भारत प्रजासत्ताक देश झाल्यापासून ना कोणी राजा राहिला, ना कोणी संस्थानिक! महाराष्ट्राच्या लोकजीवनात शाहू महाराज यांच्याविषयी असलेल्या आदरामुळे आजही त्यांच्या वंशजांना महाराष्ट्राची जनता आपल्या मनाने राजे म्हणते. मात्र, यात केवळ, मराठा समाजाचाच समावेश नाही; तर, महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज त्यांचा आदर करतो. जनतेने हा सन्मान छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्व वारसांना दिला आहे. परंतु, माजी खासदार असलेले संभाजीराजे भोसले यांना हा सन्मान घेता येत नाहीऐ, अशीच परिस्थिती सध्या तरी दिसत आहे. त्याशिवाय, का ते आंतरवली सराटीत फक्त मराठा आरक्षणाचे उपोषण मंडपाला भेट देऊन, त्याच गावात ओबीसीं आरक्षण उपोषणकर्त्यांच्या मंडपाला भेट न देणं, हा प्रकार त्यांच्या मनात जातीयवादाने घर केलयं, याचा निदर्शक आहे.
काहीच दिवसांपूर्वी विशालगडला भेट देण्यासाठी निघालेले माजी खासदार संभाजी भोसले यांची उपस्थिती राहुनही विशाल गडाच्या पायथ्याला अवघ्या तीन किमी अंतरावर गाजापूर येथे मुस्लिम समुदायाच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. यात माजी खासदार संभाजी भोसले हे पोहोचण्यापूर्वीच गाजापूर येथे केलेल्या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले होते; परंतु, नंतर एकूण पाचशे लोकांच्या विरोधात कोल्हापुरात जो गुन्हा नोंदवला गेला त्यात संभाजी भोसले यांचे नावाचाही समावेश केला गेल्याचा उल्लेख काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. याचा अर्थ माजी खासदार संभाजी भोसले यांनी शाहू महाराज यांच्या विचारांशी सुसंगत नसलेल्या विचारांबरोबर जाण्याचा त्यांचा मानस आहे, हे स्पष्ट होते. काल, ओबीसी उपोषणकर्त्यांनी त्यांच्यावर घेतलेला आक्षेप रास्त होता, असेच दिसते. खरंतर, माजी खासदार संभाजी भोसले यांचे नाव भारतीय जनता पक्ष पुरस्कृत राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नेमणूक करण्यात आली, तेव्हापासून त्यांचे राजकारण सामाजिक न्यायाशी सुसंगती राखणारे नाही, असाच सूर उमटताना दिसतो. अर्थात, इव्हेंट मॅनेजमेंट च्या माध्यमातून संभाजी भोसले सतत चर्चेत असतात. सध्या महाराष्ट्रात ते चर्चेत अधिक राहतात, त्यामागे देखील इव्हेंट मॅनेजमेंट हाच आधार असल्याचे लपून राहिलेले नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर, छत्रपतींचा वारसा ज्यांना लाभला आहे, त्यांच्याविषयी समाजाला कायम आदर आणि कुतूहल वाटत. परंतु, राजकारणात आपला वापर करू देण्याची मुभा त्यांनी दिली; तर, लोकांमध्ये त्यांच्याविषयी कुतूहल तर कमी होईलच; मात्र, समाजात संघर्ष पेटविण्याच्या राजकारणात त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग देणे समाजाला अपेक्षित नाही. समाजाच्या या भावनांचा माजी खासदार आदर करतील हीच त्यांच्याविषयी लोकांना अपेक्षा आहे. लोकांच्या या अपेक्षांचा ते अव्हेर करणार नाहीत, अशी अपेक्षा बाळगू या!
COMMENTS