Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजू बाविस्कर यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : देशातील साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार यंदासाठी जाहीर करण्यात आला असून मराठी भाषेतून साहित्य

सहारा विकास संस्थेकडून महिलांना मार्गदर्शन व विशेष सन्मानाचा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न
राजमाची येथील विहिरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवनदान
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावणार ‘जयंती फलक’: मंत्री मंगल प्रभात लोढा


नवी दिल्ली : देशातील साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार यंदासाठी जाहीर करण्यात आला असून मराठी भाषेतून साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राची निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेतून पुरस्कारासाठी पाठविण्यात आलेल्या एकूण अकरा पुस्तकांमधून बाविस्कर यांच्या साहित्यकृतीची अंतिम निवड झाली आहे.
साहित्य अकादमीकडून दरवर्षी मान्यताप्राप्त चोवीस भारतीय भाषांमधील उल्लेखनीय साहित्यकृतींचा गौरव करण्यात येतो. सन 2025 च्या पुरस्कार प्रक्रियेची सुरुवात जानेवारी महिन्यात झाली होती. त्यासाठी 30 जानेवारी 2025 रोजी खुली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. विविध भारतीय भाषांतील तज्ज्ञ परीक्षक मंडळाने सुचविलेल्या साहित्यकृतींची छाननी करून अखेरच्या यादीला अकादमीच्या सक्षम प्राधिकरणाने मंजुरी दिली. यंदा चोवीस भाषांमधून एकूण अनेक प्रकारच्या साहित्यकृतींची निवड झाली आहे. त्यामध्ये आठ कवितासंग्रह, चार कादंबर्‍या, सहा लघुकथा संग्रह, दोन निबंधसंग्रह, एक साहित्य समीक्षा ग्रंथ, एक आत्मचरित्र आणि दोन स्मरणिकांचा समावेश आहे. मराठी भाषेतील आत्मचरित्र या प्रकारात ‘काळ्यानिळ्या रेषा’ या पुस्तकाने मानाचा बहुमान मिळवला आहे. या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह म्हणून कोरीव ताम्रपट, शाल आणि एक लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात विजेत्या साहित्यिकांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेतून यंदा पुरस्कारासाठी विविध साहित्यप्रकारांतील अकरा पुस्तकांची शिफारस करण्यात आली होती. त्यामध्ये वसंत दत्तात्रय यांचा ‘कोलाहल’ हा कवितासंग्रह, सतीश तांबे यांचा ‘काम तमाम अ‍ॅट वाघा बॉर्डर’ हा लघुकथा संग्रह, शरद बाविस्कर यांचे ‘भूरा’ हे आत्मचरित्र, अभिराम भडकमकर यांची ‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी, रवींद्र इंगळे चावरेकर यांचा ‘सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास’ हा भाषाशास्त्रीय ग्रंथ, देविदास फुलारी यांचा ‘रात्र भरत आहे’ हा कवितासंग्रह, बाबू बिरादार यांची ‘अधिवास’ ही कादंबरी, किशोर कदम सौमित्र यांचा ‘बाऊल’ हा कवितासंग्रह तसेच रमेश डोंगरे यांचे ‘विंदांची कविता : शैलीवैज्ञानिक विश्‍लेषण’ हे समीक्षणात्मक पुस्तक यांचा समावेश होता. इतर भाषांमध्येही उल्लेखनीय साहित्यकृतींची निवड झाली आहे. हिंदी भाषेतून ममता कलिया यांच्या ‘जीते जी अलाहाबाद’ या स्मरणिकेला, इंग्रजी भाषेतून नवतेज सरना यांच्या ‘क्रिमसन स्प्रिंग’ या कादंबरीला, तर कोकणी भाषेतून हेन्री मेंडोका यांच्या ‘कोकणी काव्ये : रुपानी आणि रुपकम’ या निबंधसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

COMMENTS