अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरातील वाढत्या धार्मिक आणि जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर येत्या शहीद दिनी, गुरुवारी दिनांक 23 मार्च 2023 रोजी सद्भा
अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरातील वाढत्या धार्मिक आणि जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर येत्या शहीद दिनी, गुरुवारी दिनांक 23 मार्च 2023 रोजी सद्भावना पदयात्रेचे आयोजन सामाजिक संस्था, संघटना, विविध महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या मदतीने करण्यात आले आहे. सद्भावना आणि शांतता प्रेमी नगरकरांना या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन स्नेहालय परिवाराने केले आहे. यासंदर्भात 9011026472 या क्रमांकावर संपर्काचे आवाहन समन्वयक विकास सुतार, संचालक हनीफ शेख आणि अनामप्रेम प्रकल्पाचे समन्वयक उमेश पंडुरे यांनी केले आहे. या पदयात्रेत फक्त तिरंगा राष्ट्रध्वज घेऊनच सर्व सहभागी होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
समाजात सद्यस्थितीमध्ये वाढणारा जातीय आणि धार्मिक उन्माद, द्वेषासाठी तरुणाईचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी तसेच सर्व सण-उत्सव शांततेने साजरे व्हायला हवेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर पोलिस यंत्रणेवर ताण येतो व गरीब-कष्टकरी-सर्वसामान्य नागरिकांनाच या संघर्षाची किंमत मोजावी लागते. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये सदभावना पदयात्रा काढली जाणार आहे. ही पदयात्रा माळीवाडा, वाडिया पार्क येथून सकाळी 9 वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सुरू होईल. विशाल गणपती मंदिर, आशा स्क्वेअर, माणिक चौक, नेता सुभाष चौक, चितळे रस्ता, दिल्ली गेट, हुतात्मा स्मारक, पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंग उद्यान येथे ती पोहोचेल व तेथे भगतसिंग पुतळ्यास अभिवादन केल्यावर पेमराज सारडा महाविद्यालयातील बहुद्देशीय सभागृहात पदयात्रेचा सकाळी 11 वाजता समारोप होणार आहे. दिनांक 23 मार्च रोजी क्रांतीकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव फासावर चढले. या शहिदांच्या स्वप्नातील समर्थ, सदभावयुक्त भारताचे स्मरण तरुणाईला देण्याचा प्रयत्न या पदयात्रा उपक्रमातून होणार आहे.
COMMENTS