Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीकडून अजित पवारांना दिलासा

राज्य सहकारी बँक घोटाळा ः आरोपपत्रात तूर्तास नाव वगळल्याने आश्‍चर्य

मुंबई/: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एक आरोपपत्र दाखल केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित

शरद पवारांची रणनीती मोदी सरकारला शह देणार का ? l Lok News24
एसटी संपाचा तिढा सुटता सुटेना
जयहिंदची जळगावात तीन दिवसीय ग्लोबल कॉन्फरन्स

मुंबई/: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एक आरोपपत्र दाखल केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनी विरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र त्यात तूर्तास दोघांचे नाव नाही. कारण काही दिवसांत पुरवणी आरोपपत्र दाखल करणार आहे. त्यामुळे अजित पवार यांचे नाव त्यात असेल की नाही, याबाबत संभ्रम आणि टांगती तलवार आहे.

ईडीने आत्तापर्यंत एकदाही अजित पवारांना चौकशीसाठी समन्स बजावलेले नाही. दरम्यान अजित पवार यांनी मात्र नाव वगळल्याचे वृत्त फेटाळले आहे. ईडी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप क्लीन चीट दिलेली नाही. माझ्या माहितीनुसार चौकशी सुरु आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. जुलै 2021 मध्ये ईडीने या प्रकरणात 2010 मध्ये जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची एकूण 65 कोटी रुपयांची जमीन, इमारत आणि साहित्य यासह मालमत्ता जप्त केल्या होत्या. न्यायालयाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतली नसून पुढील सुनावणी 19 एप्रिल रोजी होणार आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी आरोपपत्र आणि अजित पवार यांच्याशी संबधित प्रश्‍नांवर उत्तर देण्याचे टाळले. ईडीने त्या वेळी हे स्पष्ट केले होते की, ही संपत्ती सध्या गुरू कमोडिटी सर्व्हिसेसच्या नावावर आहे आणि जरंडेश्‍वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला लीजवर आहे. या कारखान्याचा लिलाव कमी किंमतीत झाल्याचा आरोप करण्यात आला होता. जरंडेश्‍वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडचे बहुतांश शेअर्स स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे आहेत. स्पार्कलिंग सॉईल ही अजित पवार आणि सुनेत्रा अजित पवार यांच्याशी संबंधित कंपनी असल्याचे तपासात समोर आले आहे. ईडीनेही मिलचा वापर केल्याचा आरोप केला होता. या बँकेचा इतिहास तपासला जात असताना या कारखान्याच्या नावे नव्याने घेतलेले कर्ज हे संशयाच्या भोवर्‍यात अडकले. कारण ज्या बँकानी कर्ज दिले त्या बँकांवर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वर्चस्व होते.

अद्याप क्लीन चीट नाही ः  अजित पवार – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडी कडून चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लिनचिट मिळालेली नाही, असे सांगत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. त्यामुळे ईडीने अजित पवार व सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट दिली का?, अशी चर्चा रंगली आहे.

19 एप्रिलला विशेष सुनावणी – ईडीने अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवले आहे. कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे. त्यामुळे अजित पवार यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आतापर्यंत ईडीने या प्रकरणी अजित पवार यांची एकदाही चौकशी केली नाही. 19 एप्रिल रोजी ईडीच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीत नेमके काय होते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे. त्यामुळे गरज पडल्यास ईडी पुन्हा पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकणार आहे. त्यामुळे पुढील आरोपपत्रात अजित पवार यांचे नाव येणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

COMMENTS