Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिकेत मे अखेरपर्यंत होणार भरती

आयुक्त डॉ. जावळे यांची महासभेत ग्वाही

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभागृहात पाणी प्रश्‍नावर व विकास योजनेच्या आराखड्यावर चर्चा सुरू असताना अभियंते व कर्मचार

कोपरगावात दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाहणी सुरू करा
खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पुढाकारातून श्री विवेकानंद विद्यामंदिर येथे चित्रकला स्पर्धा संपन्न
कोपर्डीतील युवकाचे अपघाती निधन

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभागृहात पाणी प्रश्‍नावर व विकास योजनेच्या आराखड्यावर चर्चा सुरू असताना अभियंते व कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर नगरसेवक भैय्या गंधे यांनी भरती प्रक्रियेबाबत माहिती विचारली. येत्या मे महिन्याच्या अखेरीपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्पष्ट केले. तसेच मानधनावर अभियंता नियुक्ती संदर्भात झालेल्या प्रक्रियेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबतही लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

सदस्य निवडीनंतर झालेल्या विशेष सभेत शहरातील विविध वसाहती, रस्ते व भागांना नावे देण्याचे अकरा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनामार्फत युनिटची मागणी करणे व इरादा जाहीर करण्याचा विषय मंजूर करताना सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी शहराचा वाढता विस्तार व जागांची कमतरता लक्षात घेऊन शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. दरम्यान, सभेत सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी पाणी प्रश्‍नावरून प्रशासनाला जाब विचारला. विशेष सभेच्या सुरुवातीलाच नगरसेविका दिपाली बारस्कर, रुपाली वारे, संपत बारस्कर, सागर बोरुडे यांनी पाणी प्रश्‍नावरून प्रशासनाला जाब विचारला. अभियंता रोहिदास सातपुते यांनी प्रश्‍नांना उत्तर देताना माझ्याकडे फक्त वितरण व्यवस्था असल्याचे सांगितले.

जल अभियंता परिमल निकम रजेवर असल्याने अभियंता गाडळकर यांनी उत्तरे देत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नामकरणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विकास योजनेच्या नवीन आराखड्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी सभापती वाकळे यांनी शहराच्या वाढत्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष वेधले. मनपा हद्दीतील बहुतांश परिसर विकसित झाले आहेत. नव्या आराखड्यानंतर भविष्यात वाढत्या विस्तारामुळे हद्दवाढ करावी लागणार असल्याचे मत व्यक्त केले. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी महासभेच्या सूचनेनुसार हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करता येईल, मात्र, कोणते क्षेत्र घ्यायचे याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र या विषयावर चर्चा झाली नाही. सभेच्या शेवटी नगरसेवकांनी पथदिवे ठेकेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी अद्याप पथदिवे बसविण्यात आले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रशासनाकडून लवकरात लवकर पथदिवे बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले.

COMMENTS