श्रीगोंदा : आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना खा.निलेश लंके यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. “आव्हान मिळाल्यास पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी २०२९ मध्ये पारनेर विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत केलेले विधान हे केवळ ‘गुगली’ असल्याचेही स्पष्ट केले. श्रीगोंदा येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के आणि प्रा. संजय लाकुडझोडे उपस्थित होते. लंके म्हणाले, “सध्या आमची सत्ता नसल्यामुळे विकासकामांमध्ये अनेक अडथळे येत आहेत. मात्र, यामुळे मी मतदारसंघाशी संपर्क कमी केलेला नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.” सत्तेअभावी निधी व प्रशासकीय पातळीवर अडचणी येत असल्या, तरी जनतेशी नाळ घट्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. घोड धरणावरून प्रस्तावित साकळाई योजनेबाबत विचारले असता त्यांनी संतुलित भूमिका मांडली. “साकळाई योजना झालीच पाहिजे; मात्र त्यात कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. स्थानिक शेतकरी, नागरिक आणि पाणीवाटपाच्या प्रश्नांचा सखोल विचार करूनच निर्णय व्हावा, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. याचबरोबर कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी डिंबे–माणिकडोह योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. “ही योजना पूर्ण झाल्याशिवाय कुकडीखालील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. जलसिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शेती व पाणी व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रलंबित प्रश्नांवर राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे सांगितले. भविष्यात घोड धरणात भीमेचे पाणी आणण्याची गरज भासू शकते, असेही त्यांनी सूचित केले. दरम्यान, श्रीगोंदा भेटीदरम्यान लंके यांनी काही संवेदनशील राजकीय विषयांवर थेट भाष्य टाळल्याने त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज्यात काही मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत आहेत का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

श्रीगोंदा : आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना खा.निलेश लंके यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. “आव्हान मिळाल्यास पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी २०२९ मध्ये पारनेर विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत केलेले विधान हे केवळ ‘गुगली’ असल्याचेही स्पष्ट केले. श्रीगोंदा येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के आणि प्रा. संजय लाकुडझोडे उपस्थित होते.
लंके म्हणाले, “सध्या आमची सत्ता नसल्यामुळे विकासकामांमध्ये अनेक अडथळे येत आहेत. मात्र, यामुळे मी मतदारसंघाशी संपर्क कमी केलेला नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.” सत्तेअभावी निधी व प्रशासकीय पातळीवर अडचणी येत असल्या, तरी जनतेशी नाळ घट्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
घोड धरणावरून प्रस्तावित साकळाई योजनेबाबत विचारले असता त्यांनी संतुलित भूमिका मांडली. “साकळाई योजना झालीच पाहिजे; मात्र त्यात कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. स्थानिक शेतकरी, नागरिक आणि पाणीवाटपाच्या प्रश्नांचा सखोल विचार करूनच निर्णय व्हावा, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
याचबरोबर कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी डिंबे–माणिकडोह योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. “ही योजना पूर्ण झाल्याशिवाय कुकडीखालील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. जलसिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शेती व पाणी व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सर्व प्रलंबित प्रश्नांवर राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे सांगितले. भविष्यात घोड धरणात भीमेचे पाणी आणण्याची गरज भासू शकते, असेही त्यांनी सूचित केले.
दरम्यान, श्रीगोंदा भेटीदरम्यान लंके यांनी काही संवेदनशील राजकीय विषयांवर थेट भाष्य टाळल्याने त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज्यात काही मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत आहेत का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

COMMENTS