Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेची 2 कोटींची वसुली

पुणे : रेल्वे गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणार्‍यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल महिन्यात विन

चुलत्याला शिविगाळ ; जाब विचारणार्‍या पुतण्यावर बतई ने हल्ला
पेट्रोल-डिझेल महागले…चला घोड्यावर ; काँग्रेसचे नगरमध्ये अभिनव आंदोलन
परळी बस स्थानकातील हिरकणी कक्षाची दुरावस्था

पुणे : रेल्वे गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणार्‍यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल महिन्यात विनातिकीट प्रवास करणार्‍या 28 हजार 167 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 29 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवाशांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर यासाठी सातत्याने तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईची आकडेवारी रेल्वेने जाहीर केली आहे. या कालावधीत पुणे विभागात विनातिकीट प्रवास करणार्‍या 28 हजार 167 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 2 कोटी 29 लाख 22 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेने एप्रिलमध्ये अनियमित प्रवास करणार्‍यांवरही कारवाई केली आहे. रेल्वेने अनियमित प्रवास करणार्‍या 8 हजार 589 जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 50 लाख 69 हजार रुपयांचा दंड वसूल केला. याचबरोबर नोंदणी न करता सामान घेऊन जाणार्‍या 206 प्रवाशांवर मागील महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 21 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

COMMENTS