Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाहीला जिवंत ठेवण्यास संविधानाचे रक्षण गरजेचे : आ. पृथ्वीराज चव्हाण

पाटण : नूतन पदाधिकार्‍यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करताना आ. पृथ्वीराज चव्हाण समवेत धनश्री महाडिक, हिंदूराव पाटील, मनोहर शिंदे व मान्यवर. पाटण

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होतील – राज्यपाल कोश्यारी
भगवान क्षीरसागर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव मोठे करा
पाटण : नूतन पदाधिकार्‍यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करताना आ. पृथ्वीराज चव्हाण समवेत धनश्री महाडिक, हिंदूराव पाटील, मनोहर शिंदे व मान्यवर.

पाटण / प्रतिनिधी : देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देश सर्वच क्षेत्रात पिछाडीवर गेला आहे. अर्थव्यवस्था कोलमडून गेल्याने हे सरकार देशाची प्रगती करु शकत नसल्याने अपयशी ठरले आहे. देश अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असून सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळून गेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील काँग्रेसचा विचार कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असला तरी देशाला केवळ काँग्रेसचा विचार तारु शकतो. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता संविधानाच्या रक्षणासाठी काम करावे लागणार आहे. देशातील लोकशाहीला जिवंत ठेवण्याबरोबर देशाला केवळ काँग्रेसचा विचार तारु शकतो, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पाटण येथील वि. स. तथा भाऊ मोकाशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पाटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांतिक सदस्य हिंदूराव पाटील, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा बँकेचे माजी संचालक एल. एम. पवार, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद घाडगे, तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव, महिला तालुकाध्यक्षा वंदनाताई आचरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप आणि संघ देशाच्या संविधानावर घाला घालत आहेत. हुकूमशाहीमुळे लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या परिस्थितीतून देशाला सावरण्यासाठी काँग्रेसच्या विचारांची गरज निर्माण झाली आहे. काँग्रेस अनेक अडचणीतून निश्‍चित ध्येयापर्यंत वाटचाल करीत असताना तळागाळातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरील जबाबदारी वाढली आहे. पक्षाने ज्या विश्‍वासाने निवडी केल्या आहेत त्या पदांचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी करून त्यांचा विश्‍वास संपादन करा. पक्ष कार्यकारिणीचे गावपातळीवर नियोजन करा, कार्यकारिणीची दरमहा बैठक घेऊन सर्वसामान्य माणसाला कोण काम करत आहे ते दाखवून द्या. बुथ कमिट्यांची स्थापना करून तळागाळातील माणसापर्यंत काँग्रेसचा विचार आणि कामे घेऊन पोहचा. गावपातळीवरील कार्यकर्ते व बुथ कमिट्यांनी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध विषयांचे 21 सेल स्थापन करण्याच्या प्रांतिक सूचना असून त्यासाठी नियोजन करावे. तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसला नवचैतन्य आणि गतवैभव मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करु या, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
हिंदूराव पाटील म्हणाले, तालुक्यातील काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नात कमी पडणार नाही. तालुक्यातील अतिवृष्टी व भूस्खलनामुळे निवारा गमावून बसलेल्या नुकसानग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मंत्री वडेट्टीवार यांच्याकडे प्रयत्न केले आहेत, असे सांगीतले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, मनोहर शिंदे, नरेश देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रांतिक सदस्य हिंदूराव पाटील यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव यांनी आभार मानले.

COMMENTS