अहिल्यानगर : अखिल भारतीय नाट्य परिषदेने 100 वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा मान अहिल्यानगर उपनगर शाखेला दिला आहे. त्यानुसार दि.26 व
अहिल्यानगर : अखिल भारतीय नाट्य परिषदेने 100 वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा मान अहिल्यानगर उपनगर शाखेला दिला आहे. त्यानुसार दि.26 व 27 जानेवारी 2025 रोजी हे विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगरमध्ये माऊली सभागृह व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. नाट्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली असून नगरकर नाट्य रसिक तसेच रंगकर्मींना मोठी सांस्कृतिक मेजवानी या संमेलनातून मिळणार आहे. नगरकर रसिकांनी मोठ्या संख्येने संमेलनातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे निमंत्रक आ.संग्राम जगताप यांनी केले आहे.
संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत दोन दिवस बालनाट्य महोत्सव, लोककला महोत्सव, एकपात्री, संगीत नाट्य नाट्य प्रवेश, प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांचे प्रयोग, एकांकिका, चर्चासत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण शिबिरे असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ.बापूसाहेब कांडेकर, विभागीय संमेलन प्रमुख क्षितीज झावरे यांनी दिली. संमेलनानिमित्त माऊली सभागृहात नाटकांचे प्रयोग होणार आहेत. दि.22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता तुझी औकात काय आहे? या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. दि.23 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता साती साती पन्नास, दि.25 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता मर्डरवाले कुलकर्णी व समारोपाच्या दिवशी दि.27 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता मोरुची मावशी हे नाटक सादर होणार आहे. दि.24 जानेवारी रोजी भव्य बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी 10 ते 11 यावेळेत अजय लाटे लिखित आणि शैलेश देशमुख दिग्दर्शित एकांकिका जिना इसिका का नाम है ! सादर होईल. सकाळी 11 ते 12 यावेळेत गौरी जोशी लिखित आणि डॉ. विजयकुमार दिग्दर्शित एकांकिका – हीच खरी सुरवात, दुपारी 12 ते 1 यावेळेत भारत शिरसाठ आणि चेतन सैंदाणे लिखित व आत्मदर्शन बागडे दिग्दर्शित एकांकिका – डस्टर सादर करण्यात येईल. दुपारी 1 ते 2 यावेळेत उदघाटन समारंभ होणार असून दुपारी 2 ते 3.30 यावेळेत रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन निर्मित कृष्णलीला ही नृत्य नाटिका सादर होणार आहे. अशी माहिती उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर आणि प्रमुख कार्यवाह चैत्राली जावळे यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 11 यावेळेत लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 ते 12 यावेळेत एकपात्री आणि नाट्यप्रवेश सादरीकरण , दुपारी 12 ते 1.30 यावेळेत संगीत नाटकातील नाट्यप्रवेश, दुपारी 2 ते 3 यावेळेत परिसंवाद, चर्चासत्र होईल. दुपारी 3 ते 4 यावेळेत धाराशिव येथील सुप्रसिद्ध कलाकार विशाल शिंगाडे निर्मित कार्यक्रम होणार आहे. दि.27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 11 यावेळेत पुरुषोत्तम करंडक विजेती एकांकिका – देखावा (न्यू आर्टस् कॉलेज) सादर करण्यात येणार आहे. सकाळी 11.15 ते 12.15 यावेळेत उपनिषद (संकल्पना फौंडेशन, कोपरगाव),
दुपारी 12.30 ते 1.30 दरम्यान ब्रँडेड बाय सडकछाप (अहिल्यानगर) या गाजलेल्या एकांकिकांचे सादरीकरण होईल. दुपारी 2.30 ते 3.30 यावेळेत नाट्यजागर विजेती एकांकिका नवस सादर होणार आहे. दुपारी 3.45 ते 5.00 नाटक समजून घेताना या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बर पटेल, दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले सहभागी होणार आहेत. संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान संमेनलाचा समारोप समारंभ होणार आहे.
संमेलनाचे यजमानपद मिळाल्याने रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. सर्व कलाप्रेमी नगरकरांसाठी संमेलन संस्मरणीय ठरावे यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या संमेलनामुळे नगरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडेल, असा विश्वास स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी व्यक्त केला. या प्रसंगी मध्यवर्ती चे कोषाध्यक्ष सतीश लोटके, अहील्यानगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, मार्गदर्शक पी.डी.कुलकर्णी, जालिंदर शिंदे आदी उपस्थित होते.
COMMENTS