मुंबई : राज्यात सध्या कडाक्याच्या उन्हाचा तडाखा जाणवत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. बहुतांश भागात हवामान कोरडे आणि उष्ण

मुंबई : राज्यात सध्या कडाक्याच्या उन्हाचा तडाखा जाणवत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. बहुतांश भागात हवामान कोरडे आणि उष्ण राहिले असून किनारपट्टीच्या भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक तीव्र जाणवत आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असतांनाच आज आणि उद्या अर्थात 13 आणि 14 मार्चदरम्यान विदर्भ, मराठवाडा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टी परिसरात उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या पावसाची शक्यता नसली तरी उकाडा आणि उष्णतेचा त्रास काही भागांत जाणवू शकतो. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतही तापमानाचा पारा चढलेला आहे. पुणे वेधशाळेतील हवामानतज्ज्ञ सखाराम सानप यांनी सांगितले की, राज्यभर तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे तसेच पाणी व इतर द्रवपदार्थांचे सेवन वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. सध्या अकोला येथे राज्यातील सर्वाधिक सुमारे 41 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून पुण्यातही तापमान सुमारे 39 अंशांपर्यंत पोहोचले आहे. मुंबईसह समुद्रकिनारी भागांतही तापमानात वाढ दिसून येत आहे. काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास प्रदूषणामुळे धुक्यासारखा थर दिसून येत असला तरी याबाबत घाबरण्याचे कारण नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान विदर्भातील अनेक भागांत तापमान 40 अंशांच्या आसपास पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात उष्णतेचा त्रास अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या परिसरात प्रतिचक्रवर्ती स्थिती निर्माण झाल्यामुळे उष्णतेची तीव्रता वाढल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. मात्र संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट नसून काही भागांतच तिचा प्रभाव जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 14 मार्चनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे पुढील काही दिवसांत हवामानात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.

COMMENTS