सतराव्या आयपीएल सत्राच्याच्या छापन्नव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा वीस धावांनी पराभव केला. दिल्लीने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फ
सतराव्या आयपीएल सत्राच्याच्या छापन्नव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा वीस धावांनी पराभव केला. दिल्लीने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांत ८ गडी गमावून २२१ धावा केल्या. अभिषेक पोरेलने सर्वाधिक ६५ धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात राजस्थान संघाला वीस षटकांत ८ बाद २०१ धावाच करता आल्या. आरआरचा कर्णधार संजू सॅमसनने ४६ चेंडूत ८६ धावा केल्या. संजूला झेलबाद देण्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर कुलदीप यादवने अठराव्या षटकात दोन गडी बाद करत सामन्याचे रूपच पालटले.
राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव असून या अगोदर सनरायझर्स हैदराबादने त्यांचा एका धावेने पराभव केला होता. तर दिल्लीचा १२ सामन्यातील हा सहावा विजय ठरला, बारा गुणांसह दिल्ली सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. या पराभवामुळे राजस्थानला प्ले ऑफसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यांचे सोळा गुण असून अजूनही ते गुणतालिकेत आघाडीवरच आहेत. दिल्लीचा पुढील सामना १२ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियम होणार आहे. तर १२ मे रोजी चेपॉकवर राजस्थान रॉयल्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे.
वास्तविक राजस्थानला शेवटच्या पाच षटकांत ६३ धावा करायच्या होत्या. पंधराव्या षटकात आरआरची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा अशी होती. त्या वेळी संजू सॅमसन ८५ आणि शुभम दुबे १४ धावांसह मैदानात होते. यानंतर सोळाव्या षटकात सॅमसन बाद झाला. तरीही त्या षटकात अकरा धावा झाल्या. सतराव्या षटकात अकरा धावा निघाल्या. त्यावेळी दोन पॉवर हिटर डोनोव्हन फरेरा आणि रोव्हमन पॉवेल क्रिझवर होते. अठराव्या षटकात कर्णधार रिषभ पंतने जुगार खेळत कुलदिप यादवकडे चेंडू सोपवला. पहिल्याच चेंडूवर कुलदिपने फरेराला पायचित केले. त्याच षटकात आर अश्विन शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. या दोन विकेट्समुळे दिल्लीची स्थिती मजबूत झाली. अठराव्या षटकात चार धावा झाल्या. यानंतर १९ व्या षटकात आठ धावा निघाल्या आणि पुन्हा २० व्या षटकात आठ धावा झाल्या. राजस्थानला शेवटच्या पाच षटकांत केवळ ४२ धावा निघाल्या. दिल्लीने फलंदाजी करताना शेवटच्या तीन षटकात ५३ धावा ठोकल्या होत्या, तर राजस्थानला शेवटच्या तीन षटकात केवळ वीस धावाच करता आल्या.
आयपीएलच्या विद्यमान सत्रात दोनशेच्या वर धावा करायचे सर्व विक्रम मोडीत निघाले. मागील हंगामात, दोन्ही डावांसह १२ वेळा २०० किंवा त्यापेक्षा धावा केल्या गेल्या होत्या. तर या हंगामात आतापर्यंत तेरा डावांमध्ये २००+ धावा निघाल्या आहेत. हा आयपीएलचा हा नवा विक्रम आहे.
तत्पूर्वी, दिल्लीने राजस्थानसमोर २२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्लीने वीस षटकांत ८ गडी गमावून २२१ धावा केल्या. जॅक फ्रेझर मॅकगर्कने २० चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या तर अभिषेक पोरेलने ३६ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६५ धावा ठोकल्या. फ्रेझर आणि पोरेल यांच्यात सलामीच्या जोडीसाठी २६ चेंडूत ६० धावांची भागीदारी झाली. याशिवाय शाई होप एक, अक्षर पटेल १५ आणि कर्णधार रिषभ पंत पंधरा धावा करून बाद झाला.
आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या गुलबदिन नईबने १९ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने वीस चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. रसिख दार सलामने तीन चेंडूंत नऊ आणि कुलदीप यादवने दोन चेंडूत नाबाद पाच धावा केल्या. रसिख डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. राजस्थानकडून अश्विनने सर्वाधिक तीन बळी घेतले तर ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. अक्षर आणि पोरेल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी २५ चेंडूत ४२ धावांची भागीदारी झाली. गुलबदिन नईब आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी सहाव्या विकेटसाठी २९ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली.
विजयासाठी २२२ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल ( ४) पहिल्याच षटकात खलीलचा बळी ठरला. येथून सॅमसन आणि बटलरने ३३ चेंडूत ६३ धावांची भागीदारी केली. बटलर (१९) पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पॉवर प्लेमध्ये राजस्थानने २ बाद ६७ धावा केल्या होत्या. त्यानंतर सॅमसनने रियान परागसोबत ३६ धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये परागच्या २७ धावा होत्या. परागला रसिखने बोल्ड केले त्यावेळी ११ षटकांत ३ बाद १०३ धावा झाल्या होत्या. सॅमसनने कुलदिपला षटकार ठोकून २८ चेंडूत आयपीएलमधील २५ वे अर्धशतक पूर्ण केले. सॅमसनने तेराव्या षटकात रसिखवर दोन षटकार आणि चौकार मारून अठरा धावा वसूल केल्या. खलीलने पंधराव्या षटकात सलग चार वाईड चेंडू टाकले. राजस्थानला ३० चेंडूत ६३ धावांची गरज होती. सॅमसन बाद झाल्यानंतर शुभमने खलीलला षटकार मारला, पण तोही १२ चेंडूत २५ धावा करून त्याच्याच चेंडूवर बाद झाला. राजस्थानला १८ चेंडूत ४१ धावांची गरज होती. कुलदीपने १८ व्या षटकात प्रथम फरेरा (१) आणि नंतर अश्विन (२) यांना बाद करून राजस्थानला अडचणीत आणले. राजस्थानला शेवटच्या षटकात २९ धावांची गरज होती, पण राजस्थानला ती गाठता आली नाही आणि २० धावांनी सामना गमावला.
राजस्थानसाठी संजूने ४६ चेंडूत ८६ धावा केल्या, त्यामध्ये आठ चौकार आणि सहा षटकार मारले. सॅमसन जेव्हा पंचाशी वाद घालत होता, तेव्हा दिल्ली संघाचा मालक पार्थ जिंदाल स्टेडियममध्ये उपस्थित होता आणि तो खूप रागावलेला दिसत होता आणि वारंवार ओरडताना दिसत होता. तो सॅमसनला मैदान सोडण्याचे संकेतही देत होता.
हा सामना दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मनापासून खेळला असला तरी सामन्यात पंचांनी खास करून तिसऱ्या पंचांनी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना आपल्या ढिसाळ कामगिरीचे प्रदर्शन करून राजस्थानच्या विजयाला धक्का दिला. राजस्थानच्या डावात मैदानावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. हा सगळा वाद सॅमसनच्या झेलाबाबत झाला. सामन्याच्या सोळाव्या षटकात संजूने एक पुलचा फटका मारला. चेंडूवर षटकार निश्चित होता. परंतु वेस्ट इंडियन क्षेत्ररक्षक शाई होपनेचे चेंडू मैदानाच्या आत झेलला खरा, पण या दरम्यान त्याला शरिरावर संतुलन राखता आले नाही आणि त्याचा डावा पाय सिमारेषेला अलगद स्पर्श करून गेला. मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवला मात्र टिव्ही पंचाने उपलब्ध यंत्रणेचा योग्य वापर न करताच, पूर्ण शहानिशान होऊ देता संजूला बाद ठरवले. त्यामुळे मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. टिव्ही समालोचक, प्रेक्षक नाराज झाले तर राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक व सहाय्यक चमूने या विरोधात आवाज उठविला. संजूही पंचाशी भिडला. मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
त्यानंतर १९ व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर रसिख सलामने वाईड चेंडू टाकला. तो मैदानी पंचानी वाईड दिलाच नाही. यावर राजस्थानने रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांनी तीन मिनिटं पडताळणी करून सरळ वाईड लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू वैध ठरविला. यावेळी वाद झाला नाही, मात्र पंचाच्या दर्जाचे लक्तरे वेशीवर टांगले. मात्र या गदारोळात राजस्थानचा हमखास मिळणारा विजय पराभवात परावर्तीत झाला.
आयपीएलमध्ये जगातील सर्व सुविधा प्रत्येक घटकासाठी उपलब्ध असताना त्याचा योग्य उपयोग न करणे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. त्यातच तिसऱ्या पंचांकडून अशा गफलती होणं म्हणजे खेळाची टिंगल व संबंधीत खेळाडूचे नुकसान करण्यासारखेच आहे. त्यामुळे बीसीसीआयने किमान या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असून केवळ जवळच्या प्याद्यांची सोय करण्यासाठी आयपीएलसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा उपयोग करणं चुकीचं आहे.
COMMENTS