कर्जत /प्रतिनिधी : सावकारकीत सावकाराने घशात घातलेले सुमारे ६० लाख रुपये किमतीचे घर व जमीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्याच्या ताब्यात मिळवू
कर्जत /प्रतिनिधी : सावकारकीत सावकाराने घशात घातलेले सुमारे ६० लाख रुपये किमतीचे घर व जमीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्याच्या ताब्यात मिळवून दिली आहे. त्याबद्दल कर्जत पोलिसांचे कौतुक केले जात आहे. अजय राजाबापु लांडघुले (रा. बुवासाहेबनगर, कर्जत) यांनी कर्जत मधील खासगी सावकार याच्याकडून २०१४ साली ४ रुपये शेकडा व्याजदराने ४ लाखांची रक्कम घेतली होती. या रकमेचे महिन्याचे व्याज वसुल करताना सावकाराने कसलीही सीमा ठेवली नाही. तक्रारदाराने व्याजापोटी या सावकाराला काही वेळा व्याज रोख दिले. मात्र एवढयावर हा व्यवहार पुर्ण झाला नाही. फिर्यादीचे भिशीचे पैसे देणे होते, त्यासाठी सावकाराकडून पैसे घेतले होते त्याबदल्यात फिर्यादीने आपल्या नावे असलेला साडेचार लाख रुपये किमतीचा प्लॉटही खासगी सावकाराला यापूर्वी घेतलेल्या पैशाच्या व्याजापोटी लिहून दिला. तरीही सावकाराची भूक भागली नाही. सावकाराची नियत इतकी ढासळली की त्याने तक्रारदाराची पैसे देते वेळी नावावर करून घेतलेली २ गुंठे जमीन नावावर करून देत नव्हता. व्याजासह मूळ रक्कम देऊनही सावकाराने केलेली सुलतानी वसुली तक्रारदाराची झोप उडवणारी होती. व्यथित झालेले तक्रारदार अजय लांडघुले यांनी सर्व हकीगत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना कर्जत पोलीस ठाण्यात येऊन सांगितली. यादव यांनी सर्व बाबी पडताळून लागलीच सावकाराला बोलावून ‘तक्रारदाराची जमीन आणि राहते घर माघारी नावावर करून दे अन्यथा तुझ्यावर खासगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल’असे ठणकावून सांगितले. सावकाराने आपल्या ताब्यात घेतलेली जमीन व घर आता तक्रारदाराला परत केले आहे. सावकारकीत पिचलेल्या अनेक कुटुंबांना खऱ्या अर्थाने न्याय मिळत असून तालुक्यातील सावकारकीचे मूळ हळूहळू नष्ट होत आहे. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस जवान मनोज लातूरकर, सलीम शेख, शाहूराज तिकटे यांनी केली.
COMMENTS