देशभक्ती की, धर्मभक्ती

Homeताज्या बातम्यासंपादकीय

देशभक्ती की, धर्मभक्ती

भारतात नेहमी धर्मभावनेचे प्राबल्य अधिक राहिले आहे. गेल्या साडेसात दशकात भारतातील राजकारण राम मंदिर आणि बाबरी मशीद या भोवती झाल्याचे आपण अनुभवले आहे.

मद्य सम्राटाच्या फायद्यासाठी…
आरटीईच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
लोकप्रियतेचा दुसरा अर्थ

भारतात नेहमी धर्मभावनेचे प्राबल्य अधिक राहिले आहे. गेल्या साडेसात दशकात भारतातील राजकारण राम मंदिर आणि बाबरी मशीद या भोवती झाल्याचे आपण अनुभवले आहे. आपल्याकडे लोकांचे देशावर देशप्रेमापेक्षा धर्मावर धर्मप्रेम जास्त आहे. याला सर्वस्वी जबाबदार ते लोक आहेत की, ज्यांचे धर्मावर सर्वेसर्वा प्राबल्य आहे. मग धर्मावर कुणाचे प्राबल्य आहे? भारतात जे लोक धार्मिक उन्माद माजवतात ते तर दोषी आहेतच पण, त्यापेक्षा जास्त दोषी आहेत ते, जे धर्माच्या नावाने ‘माणूस आणि धर्म’,  ‘माणूस आणि देव’ यांच्यात दलाली करतात. आपल्या जगात धर्माची आणि राजसत्तेची फारकत झालेली आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे, ”राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करून धर्मसत्तेत सुधारणा करणे होय”. कर्नाटकच्या उडुपीपासून सुरू झालेला हिजाबचा वाद सुरूच आहे. तो आता मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी यांचे न्यायालयात सुनावणीसाठी आहे. न्यायालय ही आपल्या संसदीय लोकशाहीची एक संस्था. हिजाब हा धार्मिक मुद्दा. पण त्यात न्यायालय जेव्हा हस्तक्षेप करते तेव्हा ते धर्मनिरपेक्ष या संज्ञेखालीच. आता आपल्याकडे धर्मनिरपेक्ष याची मनाने व्याख्या करणारे गैबांदास भरपूर आहेत. असले गैबांदास नमुने म्हणतात की, ‘धर्मनिरपेक्ष म्हणजे, कुणी कुणाच्या धर्मात हस्तक्षेप करायचा नाही’. असे म्हणणाऱ्या निर्बुद्ध लोकांमुळे आपल्या देशात प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे. आपला देश हा संविधानावर चालतो. कुठल्या धर्मावर अगर धर्मग्रंथावर नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) मुस्लिम बांधवानी शाहिनबाग येथून सुरु केलेले आंदोलन कोरोनामुळे जरी शमले असले तरी त्यांच्या मनात अद्याप रोष आहे. हे सांगण्याचा मुद्दा हा की, या आंदोलनात मुस्लिम बंधू- भगिनींनी भारताचे संविधान हातात घेऊन आंदोलन केले होते. त्यांची खात्री झाली होती की, आपल्याला फक्त संविधानच वाचवू शकते. पण सध्या हिजाबबंदीवरून सुरु असलेल्या आंदोलनात ‘पहिले हिजाब, फिर किताब’ हे पाहायला मिळाले. आता मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब सुरक्षा देणार आहे की, संविधान सुरक्षा देणार आहे.? किंबहुना हिंदू विद्यार्थ्यांनी ज्या घोषणा दिल्या त्या विध्यार्थ्यांना यांचे भान आहे का की, त्यांना या देशात धर्माने शिक्षणबंदी होती. सध्या या मुद्यावरून जे सुरु आहे ते फक्त धर्माच्या कठोर भिंती मजबूत करण्यासाठी.
रस्त्यावरचं धर्माचं पालन हे एक प्रदर्शन असतं. आणि ते किळसवाणं असतं. आता शासकीय कामाच्या उद्धघाटनाच्या वेळी देखील असे प्रदर्शन आपल्याकडे धोरणकर्ते भरवत असतात. ते तसे बेकायदेशीरच असते. भारतात धर्मव्यवस्थेने जातीजातीत वेगवेगळ्या नियमांनी त्यांचे स्वातंत्र्याचे अधिकार गोठवलेले होते. माणसा- माणसात भेद निर्माण करून त्यांच्या विषमता पेरली होती. धर्माच्या या कठोर नियमांना हटवून त्यांना माणूस म्हणून जगता यावे यासाठी आपल्या देशात अनेक महापुरुषांनी लढे निर्माण केले. अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करून माणसांचे जीवन सुलभ करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले जीवन पणाला लावले असले तरी माणसाच्या मनातून आणि नेणिवेतून जात- धर्म अजूनही निघालेला नाही. या जात- धर्मात आजही दंगली, भांडण तंटे होतांना दिसत आहेत. मुळात माणसाच्या जीवनात नीतिमत्तेच्या जगण्यासाठी त्याला कुठल्याही रूढी परंपरा जोपासण्याची गरज नसते. आज विज्ञानाने माणसांचे जीवन प्रगतीपथावर नेले असले तरी देवाच्या नावावर ज्यांचे पोट आहे ते पंडित माणसात हे सर्व रुजवात आहेत. त्याला आधार दिला जातो धर्मव्यवस्थेचा. भारतात अशा वातावरणामुळे देशभक्तीपेक्षा धर्मभक्ती अधिक प्रबळ होत राहते. मग आज देशभक्ती महत्वाची आहे की, धर्मभक्ती? तर सर्वच भक्ती ही विविध धर्माची शक्ती असते म्हणून सर्वच भक्तीची मुक्ती करणे क्रमप्राप्त. समता आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वानी धर्ममार्गाने नव्हे तर संविधान मार्गाने जाणे गरजेचे आहे. संविधान सर्वाना समता, स्वातंत्र्य, न्याय देते ते धर्म देत नाही. 

COMMENTS