पुणे/प्रतिनिधी ः गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येवून ठेपला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यात नेहमीच प्रोत्साहन देण्यात येते. त्
पुणे/प्रतिनिधी ः गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येवून ठेपला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यात नेहमीच प्रोत्साहन देण्यात येते. त्याची प्रेरणा घेवूनच मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांनी अनेक प्रयत्न आणि प्रयोगांतून गणेशमूर्ती घडवण्यासाठी एक नवीन मिश्रण संशोधित केले आहे. तसेच त्याचे पेटंटही मिळवले आहे. एका मूर्तिकाराने मिळवलेले अशा प्रकारचे हे पहिलेच पेटंट आहे. धोंडफळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या मिश्रणापासून तयार केलेली मूर्ती पाण्यामध्ये अर्ध्या तासात विरघळत असल्याचा दावा धोंडफळे यांनी केला आहे. धोंडफळे हे 1940 पासून कला जोपासत आहेत. अभिजित यांचे वडील रवींद्र धोंडफळे यांनीही अनेक वर्षे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती पेपर पल्पच्या माध्यमातून घडवल्या आहेत. त्यांची दखल म्हणून त्यांनी या मिश्रणाला ‘रवींद्र मिश्रण’ असे नाव दिले. मिश्रणात गाळाची माती (अल्यूव्हायल सॉइल), शाडू माती व सॉफ्ट राइस ब्रान म्हणजे भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा हे घटक योग्य प्रमाणात घ्यावे लागतात. या पद्धतीने शास्त्रीय अभ्यास पहिल्यांदाच केला गेला. अभिजित हे अशा पद्धतीचे पेटंट मिळवणारे पहिलेच शिल्पकार ठरले आहेत. या पेटंटचे टायटल ‘इको फ्रेंडली वॉटर डिझॉल्व्हेबल अँड स्ट्राँग मीडिया मिक्श्चर फॉर स्क्लप्चर्स अँड आयडॉल्स’ असे आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या टेस्टिंग लॅबमध्ये मिश्रणाच्या कठीण चाचण्या घेण्यात आल्या. यात मिश्रणाची क्षमता पीओपीपेक्षा चांगली व शाडू मातीपेक्षा अधिक असल्याचे दिसले. तसेच मिश्रणाचा पाण्यात विरघळण्याचा कालावधी अर्धा तास होता. वाहतुकीच्या दृष्टीने मिश्रण सुरक्षित आहे. वजनाला हलके, रंगकाम सहजपणे व अधिक रेखीवपणे करता येते. पूर्णपणे रसायनविरहित आहे. त्यामुळे मूर्ती पटकन विरघळून ते पाणी झाडांना देता येते. पंतप्रधानांनी घेतली नोंद : या उपक्रमाची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये या चळवळीच्या नावासकट 2016 मध्ये उल्लेख करून घेतली होती. अनेक प्रयोगांनंतर अंतिम मिश्रणास 2019 मध्ये यश मिळाले. जुलै 2019 मध्ये पेटंट रजिस्ट्रेशन आणि 6 जून 2023 ला पेटंट मंजूर झाल्याचे धोंडफळे म्हणाले.
COMMENTS