Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला वेग

नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून सरकार वैध की अवैध, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे शिंदे सरका

ओबीसी आरक्षण रद्द… बारा बलुतेदारांना फास.. l Lok News24
महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
शाळा ,शासन आणि संस्था यामधील दुवा म्हणजे मुख्य लिपिक-प्रा.चंद्रकांत मुळे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून सरकार वैध की अवैध, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे शिंदे सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार टाळला होता. तब्बल दहा महिन्यांपासून केवळ काही मंत्र्यांच्या जोरावर राज्याचा कारभार सुरू असून, एका मंत्र्यांकडे तीन-चार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला असून, शिंदे सरकारला दिलासा मिळाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला वेग येतांना दिसून येत आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार 20 ते 25 मेच्या दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारवरची टांगती तलवार टळल्यामुळे सरकार आता पूर्ण ताकदीने काम करण्याची शक्यता आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुका केवळ एक वर्षांवर येवून ठेपल्यामुळे विकासकामांचा वेग शिंदे सरकार वाढवणार असून, त्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत लवकरच केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेवून, मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करू शकतात, त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजप नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आणि भाजपच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. खरंतर सरकाविरोधात विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर हे सरकार स्थिर नाही, हे सरकार कधीही कोसळेल असे बोलले जात होते, त्यामुळे या सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार केला गेला नाही. परंतु आता हे सरकार स्थिर असेल त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार होईल असे म्हटले जाऊ लागले आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील आता पूर्ण मंत्रिमंडळ बनणार आहे. एकूण 20 आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्वांना संधी दिली जाईल. मुळात स्वतः आमदार संजय शिरसाटही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शुक्रवारी बोलतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे (भाजपा – शिंदे गटाचा मित्रपक्ष) आमदार बच्चू कडू यांना याबाबतप्रश्‍न विचारल्यावर आमदार बच्चू कडू म्हणाले, येत्या 21 ते 26 मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. एकंदरीत ज्या काही वार्ता कानावर येत आहेत त्यावरून मी हे सांगतोय. मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला नाही तर तो 2024 नंतरच होईल. दरम्यान, तुम्ही मंत्रिमंडळात दिसणार का असा प्रश्‍न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, मी मंत्रिमंडळात कधी येईन हे सांगता येत नाही. परंतु दिलेला शब्द पाळणार हे मात्र निश्‍चित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रिपदासाठी अनेकांची लॉबिंग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून, अनेक आमदारांनी आपली मंत्रिपदासाठी वर्णी लागावी यासाठी लॉबिंग करणे सुरू केले आहे. साधारणतः या मंत्रिमंडख विस्तारात आणखी 15-20 मंत्र्यांची वर्णी लागू शकते. आता सध्या एकूण 20 मंत्री असून, आणखी 23 मंत्र्यांची नियुक्ती करता येते. त्यामुळे नव्याने खातेवाटप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नव्या मंत्र्यांची भर पडल्यानंतर पालकमंत्र्यांच्या यादीतही बरेच बदल केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदासाठी वाट पाहणार्‍या शिवसेना, भाजपतील अनेक आमदारांनी लॉबिंग सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

आगामी निवडणुकांसाठी भाजपची रणनीती न्यायालयाचा निर्णय बाजूने लागल्यानंतर भाजपने आपल्या गोटातील हालचाली वेगवान केल्या असून, आता मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून विशेष रणनीती आखण्यात येत असून, त्यादृष्टीने भाजप मुंबईतील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आशिष शेलार यांच्यावर नवी जबाबदारी मिळू शकते, तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांचेे इतर पक्षातील अस्वस्थ नेत्यांकडे विशेष लक्ष असून, त्यांची इच्छा असल्यास त्यांना पक्षात सामावून घेण्याची शक्यता असून, भाजपचे विशेष लक्ष अजित पवारांवर असल्याचे देखील दिसून येत आहे.

COMMENTS