पारनेर शिवसेनेशी जवळीक ; खा. डॉ. विखेंना भोवणार? ; भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेर शिवसेनेशी जवळीक ; खा. डॉ. विखेंना भोवणार? ; भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडी विरोधात भाजप असले तरी नगर जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात न

निवारा बालगृह समाजाला दिशा देणारे ठिकाण ः आमदार सुरेश धस
’अंतर्मन बोले तथास्तू’ :  सुखाचा मूलमंत्र
नगरच्या चास शिवारात…विखुरलेला मृतदेह

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडी विरोधात भाजप असले तरी नगर जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात नगरमध्ये राष्ट्रवादीशी व पारनेरला शिवसेनेशी जवळीक साधणारे भाजपचे नगर दक्षिणेचे खा. डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात पारनेर भाजपने एल्गार पुकारण्याची तयारी सुरू केली आहे. पारनेरला स्थानिक भाजपला डावलून पक्षाचे खासदार शिवसेनेला समवेत घेतात, अशी तक्रार पारनेर भाजप पदाधिकार्‍यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील हे खा. विखेंना कानपिचक्या देतात की सांभाळून घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. खासदार डॉ. विखे शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या सोयीचे राजकारण करीत असतील तर आमचेही अन्य पक्षांसोबत शत्रूत्व नाही, असा सूचक इशारा पारनेरच्या पदाधिकार्‍यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे. खा. विखे पारनेर तालुक्यात आल्यावर भाजपच्या पदाधिकार्‍यांना डावलून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना सोबत घेतात व आमचे फोनही घेत नाहीत, अशी लेखी तक्रार भाजपच्या पारनेर तालुक्याध्यक्षासंह 20 पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे विखेंविरोधात भाजप पदाधिकार्‍यांचे हे बंड पेल्यातील वादळ ठरते की उग्र रुप घेते, याची उत्सुकता वाढली आहे. पारनेरमधील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्‍वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या लेखी तक्रारीत विखेंवर विविध आरोप केले आहेत. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना विश्‍वसात घेत नाहीत, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काहीही मदत करत नाहीत, भाषणात फक्त आश्‍वासने देतात, तर दुसरीकडे शिवसेनेला सर्व प्रकारची मदत सुरू असते, भाजपच्या कार्यकर्त्यांचा फोनही घेत नाहीत, भाजप कार्यकर्त्यांना सरकारी कार्यालयात अडचणी निर्माण केल्या जातात, खासदारांमार्फत आयोजित कार्यक्रमात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले जात नाही, अशा या तक्रारी आहेत.

केल्या काही मागण्या
विखेंबद्दल तक्रार करणार्‍या पत्रात पारनेरच्या पदाधिकार्‍यांनी काही मागण्याही प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केल्या आहेत. पारनेर तालुक्यासाठी प्रदेश कार्यालयाकडून स्वतंत्र प्रभारी नेमण्यात यावा, पारनेर तालुक्यासाठी येणार्‍या खासदार निधीतील 50 टक्के खर्च भाजपच्या पदाधिकार्‍यांना विचारून करण्यात यावा, सरकारी समित्या नियुक्त करताना भाजपच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेण्यात यावे, उद्घाटनाच्या कार्यक्रमात स्थानिक पदाधिकार्‍यांची नावे असावीत, असे काही उपाय केल्यास पक्ष संघटना मजबूत होण्यास मदत होईल, असेही या पत्रात म्हटले आहे. हा तक्रार अर्ज कोरडे व चेडे यांच्यासह महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अश्‍विनी थोरात, अरूण रोहकले, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, तालुका सरचिटणीस सुनील थोरात, जिल्हा चिटणीस डॉ. अजित लंके, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब चेडे, रघुनाथ आंबेडकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष विश्‍वास रोहोकले, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उषा संतोष जाधव, युवा सरचिटणीस सागर मैंड, सचिन ठुबे, पोपट लोंढे, कृष्णाजी बडवे, बाळासाहेब नरसाळे, तुषार पवार, पोपटराव मोरे, संभाजी आमले, काशिनाथ नवले, मनोहर राऊत, सुनील म्हस्के, शहर उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते बबनराव डावखर यांच्या नावाने पाठवण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष अरुण मुंडेंसह अन्य वरिष्ठ पदाधिकार्‍यांनाही याच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

तीन वर्षात एक छदामही नाही
खासदार विखे यांच्या पारनेर दौर्‍यात शिवसेनेचे सभापती गणेश शेळके व राहूल शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी कायमच अग्रभागी असतात. त्यामुळे खासदार भाजपचे की शिवसेनेचे, असा सवाल करताना, ते आम्हाला विश्‍वासात घेत नसल्याने आम्ही गावोगावी लोकांना काय उत्तरे द्यायची, गेल्या तीन वर्षामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना खासदार निधीतला एक छदामही मिळालेला नाही. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन पारनेरमध्ये विकास कामे करावी अन्यथा आमची सुद्धा तालुक्यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी दुश्मन नाही, असे सूचकपणे यात स्पष्ट केले गेले आहे.

COMMENTS