महापौरपदासाठी शिवसेनेच्या शेंडगे रिंगणात दाखल ; उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचा आज अर्ज येणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापौरपदासाठी शिवसेनेच्या शेंडगे रिंगणात दाखल ; उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचा आज अर्ज येणार

महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांचा अर्ज सोमवारी (28 जून) दाखल झाला.

तीन दुचाकीसह चार चोरांना पोलिसांनी केले जेरबंद
श्रीराम साधना आश्रमामध्ये पुष्पवृष्टी करून प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा
ऑक्सिजन संपल्याने डॉक्टर हतबल ; खासगी रुग्णालये व्हेंटिलेटरवर

अहमदनगर/प्रतिनिधी- महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांचा अर्ज सोमवारी (28 जून) दाखल झाला. त्यांनी चार अर्ज दाखल केले असून, त्या सर्वांवर शिवसेना नगरसेवकच सूचक व अनुमोदक आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठीचा उमेदवारी अर्ज मंगळवारी (29 जून) दाखल होणार आहे. मनपाचे यंदाचे महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गाच्या पाच नगरसेविका महापालिकेत आहेत. त्यात तीन शिवसेनेच्या तसेच प्रत्येकी एक राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आहेत. यापैकी सेनेच्या तीनपैकी दोघींनी माघार घेतली आहे व राष्ट्रवादीच्या नगरसेविकेने लढण्याची तयारीच दाखवली नाही. आता उमेदवारीसाठी शिवसेनेच्या शेंडगे व काँग्रेसच्या शीला चव्हाण यांच्यात रस्सीखेच आहे. यातील शेंडगे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. 30 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. 

घोषणा निनादल्या

नगर महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महापालिकेच्या आवारामध्ये जय भवानी-जय शिवाजी, महाविकास आघाडीचा विजय असो, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गणेश भोसले, विनीत पाऊलबुद्धे, कुमार वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, माजी महापौर सुरेखा कदम, पुष्पा बोरुडे, रिता भाकरे, सुवर्णा जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, सुभाष लोंढे, मदन आढाव, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, अशोक बडे, योगीराज गाडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, अनिल बोरुडे, बाळासाहेब बोराटे, विजय पठारे, अमोल येवले, प्रशांत गायकवाड, सुरेश तिवारी, दत्ता जाधव, अशोक दहिफळे, संजय शेंडगे, संतोष गेनाप्पा, विद्या खैरे, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, अरुणा गोयल, उषा ओझा आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनाच सूचक-अनुमोदक

महापौर पदाकरिता शेंडगे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एका अर्जांवर सूचक म्हणून पुष्पा बोरुडे तर अनुमोदक म्हणून अनिल शिंदे, दुसर्‍या अर्जावर सुरेखा कदम सूचक तर गणेश कवडे अनुमोदक, तिसर्‍या अर्जावर अशोक बडे सूचक असून विजय पठारे हे अनुमोदक आहे. तर चौथ्या अर्जावर सुवर्णा गेनाप्पा या सूचक असून विद्या खैरे या अनुमोदक आहेत. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे राहणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर व शिवसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा उपमहापौर होणार आहे. उपमहापौरपदाचा अर्ज राष्ट्रवादीकडून मंगळवारी दाखल होणार आहे.

विकासासाठी कटिबद्ध- शेंडगे

यावेळी बोलताना महापौरपदाच्या उमेदवार रोहिणी शेंडगे यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षापासून आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहोत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला महापौरपदासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. तसेच या महापालिकेमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी महाविकास आघाडीची निवडणूक एकत्रितपणे आम्ही लढणार आहोत. आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. निवडणुकीनंतर आम्ही सर्वजण नगर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे सुद्धा आभार मानते, असे त्यांनी म्हटले.

काँग्रेसही आमच्या समवेत : कोरगावकर

यावेळी बोलताना शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर म्हणाले की, राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अधिपत्याखाली सध्या राज्याचा कारभार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून ही महाविकास आघाडी सध्या राज्यामध्ये कार्यरत आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हेसुद्धा या महाविकास आघाडीचे नेते आहेत. या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे येऊन सध्या सरकारमध्ये काम पाहत आहेत. त्याच पद्धतीने आता राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातूनसुद्धा महाविकास आघाडी व्हावी, या उद्देशाने आम्ही आता तयारी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एकत्रितपणे येऊन महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आमच्याबरोबर काँग्रेस व इतर पक्ष सुद्धा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंगळवारी उपमहापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही कोरगावकर यांनी यावेळी सांगितले.

वरिष्ठांच्या निर्णयाची अंमलबजावणी : आ. जगताप

यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडीने एकत्रितपणे येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झालेला आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही केली आहे. आज शिवसेनेचा महापौर पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला असून, उपमहापौर पदासाठी आम्ही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आता आम्ही कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

COMMENTS