Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदेकसारेतील हजारो वर्ष जुन्या असलेल्या ‘वीरगळ‘ दुर्लेक्षित

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात बाळ भैरवनाथांचे हजारो वर्ष जुने पुरातन मंदिर आहे या बाळभैरवनाथाच्या मंदिरासमोर छन्नी हातोड्

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार उलथापालथ ? संजय राऊत – शरद पवारांची भेट सांगतेय काय ? l पहा LokNews24
पाथर्डी शेवगाव महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धेला कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
पंडीत भारुड यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात बाळ भैरवनाथांचे हजारो वर्ष जुने पुरातन मंदिर आहे या बाळभैरवनाथाच्या मंदिरासमोर छन्नी हातोड्याने कोरीव काम केलेले  आयताकृती जे दोन दगड आहेत ते वीरगळ आहेत. गावचे मंदिर वेस स्मशानभूमी येथे वीरगळ ठेवलेल्या आढळतात. मात्र हजारो वर्ष जुन्या असलेल्या वीरगळ सध्या दुर्लक्षीत आहे.
गावातीलच कोणीतरी एखादा राजाच्या किंवा सरदाराच्या सैन्यात असलेला व्यक्ती लढता लढता किंवा गावाचे संरक्षण करताना मरण पावल्यानंतर त्याच्या पराक्रमाची स्मृती राहावी म्हणून या विरगळ बनवत असत. विरगळचा मूळ शब्द वीरकल्लू असा आहे जो कानडी भाषेतून मराठीत आला. वीर म्हणजे योद्धा आणि कल्लू म्हणजे कातळ किंवा दगड. विरगळला देशाच्या उत्तरेकडील भागात वीरब्रह्म, दक्षिणेकडील कर्नाटकात कल्लू आणि केरळात तर्रा म्हणतात. विरगळ परंपरा कर्नाटक मधून महाराष्ट्रात आली. वीरगळ बनवण्याची पद्धत राष्ट्रकुटाच्या राजवटीत सुरू होऊन ती यादव राजवटीपर्यंत चालू होते. त्यानंतर विरगळ बनवण्याची पद्धत काहीशी बंद झाली. चांदेकसारेत असलेल्या या वीरगळ चांदेकसारे गावचे प्राचीन इतिहासाचे प्रतीक आहे. या दगडांच्या म्हणजेच वीरगळीच्या अनेक वर्ष दंतकथा सांगितल्या जात असत परंतु बारकाईने निरीक्षण करून अभ्यास केल्यानंतर ह्या विरगळच आहेत असे लक्षात येते. येथे वीरगळीचे दोन प्रकार आढळतात वीरमरण प्राप्त झालेल्या पुरुषाची वीरगळ व सती गेलेल्या स्त्रीची सतीशिळा आहेत.

युद्धात वीरमरण आलेल्या वीराची पत्नी सती गेल्यावर कुटुंबातील सदस्य तिच्या नावाने कोरीव शिळा बनवत त्यास सतीशिळा म्हणतात. त्यावेळी सती जाणे प्रचलित होते. वीरगळवर शिलालेख कोरलेला नसतो त्यामुळे आपण फक्त त्या विरगळचा तर्क लावू शकतो. वीराला कशामुळे वीरगती प्राप्त झाली त्यानुसार दगडावर तीन, चार किंवा पाच प्रकारचे कप्पे करून त्यावरती प्रसंग कोरलेले असतात विरगळचे वाचन आपण खालून वरती करत असताना सर्वात खालील कप्प्यात 1) वीरमरण 2) लढाई प्रसंग 3) स्वर्गरोहण 4) स्वर्गप्राप्ती व स्वर्गात गेल्यावर शिवलिंग पूजन 5 ) कलशारोहण अशा प्रकारे वाचन होते. विरगळच्या सर्वात वरील भागाला कलशारोहण असे म्हणतात हा कलश म्हणजेच मोक्ष प्राप्तीचे प्रतिक असून त्यावर सूर्य, चंद्र अशी विविध चिन्ह कोरलेली असतात याचा अर्थ असा की जोपर्यंत सूर्य, चंद्र राहील तोपर्यंत वीराची महती राहील म्हणजे वीराचा पराक्रम अमर आहे. चांदेकसारे येथील विरगळ तीनच प्रकारात कोरलेले असून त्यात खालून वरती वाचन करत असताना 1)लढाई प्रसंग 2)शिवलिंग पूजन 3) कलशारोहण आहेत विरगळच्या खालील भागात कुठलाही प्रसंग कोरलेला नसून ती जागा तसेच ठेवण्यात आलेली आहे याचे काय कारण असावे हे कळत नाही. सतीशिळा मध्ये आकाशाकडे पाचही बोटे केलेला काटकोनात दुमडलेला हाताचा कोपरा व चुडा भरलेला हाताचा पंजा अशाप्रकारे केलेले कोरीव काम म्हणजेच सतीशिळा होय. चांदेकसारे तील ह्या आयताकृती कोरीव काम केलेल्या दोन दगडांचा हा इतिहास असून त्या विरगळच आहेत हे बारकाईने निरीक्षण व वाचन केल्यास स्पष्टपणे लक्षात येते मात्र या वीरगळीच्या वेगवेगळ्या प्रकारे दंतकथा सांगितल्या जात असत त्यामुळे श्रद्धेपोटी ह्या विरगळवरती पाणी ओतले जाते. शेंदूर फासून हळद कुंकू लावले जाते, रंग लावल्या जातो, नारळ फोडून नारळपाणी ओतल्या जाते.  त्यामुळे ह्या विरगळ विद्रुप होऊन जीर्ण झालेल्या आहेत. कित्येक वर्ष जुन्या असलेल्या या वीरगळ ऊन, वारा, पाऊस झेलत उभ्या आहेत त्यामुळे त्यांची बर्‍याच प्रमाणात झीज झालेली आहे. ह्या विरगळ शिल्पकलेचा अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे तो जपणे ही चांदेकसारे गावातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या गावात एक पराक्रमी योध्दा  होऊन गेला याची साक्ष ह्या वीरगळ देतात. ह्या वीरगळ युद्ध झालेल्या ठिकाणी आणि योद्धाच्या निवास परिसरात आढळतात.

विरगळ बनवण्याचा काळ बघता चांदेकसारे गाव व भैरवनाथ मंदिर किती जुने आहे हे लक्षात येते. हजारो वर्ष जुन्या असलेल्या या वीरगळ म्हणजेच गावाच्या इतिहासाचे मुक साक्षीदार आहेत. त्याचे संवर्धन व अभ्यास होणे खूप गरजेचे आहे. यातून चांदेकसारे गावचा जुना इतिहास उलगडला जाईल.
अरुण श्रावण खरात, चांदेकसारे, ता. कोपरगाव

COMMENTS