मुंबई : प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करताना एक व्यक्ती पाय घसरून गुरुवारी विक्रोळीमधील नाल्यात वाहून गेली. शोध मोहिमेदरम्यान शुक्रवारी या व्यक्तीचा
मुंबई : प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करताना एक व्यक्ती पाय घसरून गुरुवारी विक्रोळीमधील नाल्यात वाहून गेली. शोध मोहिमेदरम्यान शुक्रवारी या व्यक्तीचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना सापडला. पार्कसाईट पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. विक्रोळी पार्क साईट परिसरात वास्तव्यास असलेले प्रशांत सोनवणे (34) आणि त्यांचा मित्र राहुल सुरवसे (44) गुरुवारी सायंकाळी विक्रोळीमधील संगम नगर परिसरातील नाल्यातून प्लास्टिकच्या बाटल्या जमा करीत होते.
यावेळी राहुल सुरवसेचा पाय घसरला आणि तो नाल्यात पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. त्याच्यासोबत असलेल्या प्रशांत सोनवणे यांनी तत्काळ याबाबतची माहिती येथील रहिवाशांना दिली. रहिवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तात्काळ पार्कसाइट पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होताच तात्काळ शोध मोहीम हाती घेतली. ही मोहीम गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, गोदरेज हिल साईट परिसरातील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पाहणी केली असता तो मृतदेह राहुलचा असल्याचे निष्पन्न झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी राहुलचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला.
COMMENTS