Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात वृध्द ठार

पाटण / प्रतिनिधी : गुरे चारावयास गेलेल्या वृध्दावर गव्याने हल्ला केल्याने मयत झाल्याची घटना शनिवारी पाटण तालुक्यातील शिरळ (ताईचीवाडी) येथे घडली

जात पडताळणी समितीची आजपासून विशेष त्रुटी पुर्तता मोहिम
खटाव तालुक्यातील येळीव तलावात माती माफियांचा रात्रं-दिवस धुडगूस
फलटण पोलिसांकडून गुटखाविरोधी कारवाई; 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल

पाटण / प्रतिनिधी : गुरे चारावयास गेलेल्या वृध्दावर गव्याने हल्ला केल्याने मयत झाल्याची घटना शनिवारी पाटण तालुक्यातील शिरळ (ताईचीवाडी) येथे घडली. संबधित घटनास्थळी वनविभाग व पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचार्‍यांनी पंचनामा केला असून रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर वृध्दावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ताईचीवाडी (शिरळ) येथील हरिबा विठ्ठल सुर्यवंशी (वय 65) हे नेहमीप्रमाणे घरापासून सुमारे अडीच तीन किलोमीटर अंतरावरील डोंगर कपारातील जांभ दरे नावाच्या शेतात जनावरांना चारावयास होते. शनिवारी सकाळी 11 वाजता गेलेले सुर्यवंशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जनावरासमवेत घरी न आल्याने घरातील व्यक्तींनी व ग्रामस्थांनी शोध घेतला असता शेतात मयत झालेले आढळून आले. या घटनेची माहिती वनविभाग व पोलीस स्टेशनला दिली असता सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडल वनाधिकारी टी. डी. नवले, वाय. एस. सावर्डेकर, वनरक्षक व्ही. एस. हरपळ, एन. ए. कदम, वनमजूर संजय जाधव, रमेश कदम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गव्याने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली. कोयना पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली असून रात्री उशिरा घटनास्थळी पोलीस अधिकार्‍यांनी पाहणी केली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार एन. बी. साळुंखे करत आहेत.
दरम्यान, सुर्यवंशी यांच्या मृतदेहाची ग्रामीण रूग्णालयात पाटण येथे शवविच्छेदन करून रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS