Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेठ नाक्यावर सोळा लाखांचे कोकेन पकडले; नायजेरियन तरुणाची पोलीस कोठडीत रवानगी

इस्लामपूर / प्रतिनिधी : पुणे-बंगळूर महामार्गावर पेठ (ता. वाळवा) येथे एका नायजेरियन तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी कोकेन तस्करी प्रकरणी ताब्यात घेतले

४०० फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडावर अडकली l LokNews24
पावसाळ्यात अतिवृष्टीने निर्माण होणार्‍या पुरग्रस्त भागाची पहाणी
न्यायाधीशपदी निवड झालेबद्दल सचिन साळुंखे यांचा सत्कार

इस्लामपूर / प्रतिनिधी : पुणे-बंगळूर महामार्गावर पेठ (ता. वाळवा) येथे एका नायजेरियन तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी कोकेन तस्करी प्रकरणी ताब्यात घेतले आहे. येथील एका हॉटेलवर तो उतरला असताना त्याच्याकडून 16 लाख 30 हजार रुपयांचे कोकेन व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. एडवर्ड जोसेफ इदेह (वय 35, मूळ रा. नायजेरीया, सध्या रा. बंगळूर) असे त्याचे नाव आहे. त्याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी कोकेन तस्करीप्रकरणी नायजेरियन तरुणास अटक करण्यात आली होती. त्यावेळीही मोठी कारवाई पोलीस दलाने केली. त्यानुसार पुन्हा त्याच ठिकाणी ही कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की एडवर्ड हा खासगी बसमधून कोकेन अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती इस्लामपूर पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. रविवार, दि. 26 रोजी रात्री एडवर्ड बसमधून 163.610 ग्रॅम वजनाचे 16 लाख 30 हजार रुपये इतक्या किमतीचे कोकेन घेऊन इथे उतरून एका हॉटेलकडे निघाला. हॉटेलच्या दारातच त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडील काळ्या रंगाच्या सॅकमध्ये शॉम्पूची काळ्या रंगाची बाटली सापडली. त्यामध्ये कोकेनच्या 163.610 ग्रॅम वजनाच्या 15 कॅप्सुल सापडल्या. त्याची बाजारात अंदाजे किंमत 16 लाख 30 हजार इतकी आहे. एडवर्डविरुध्द एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, प्रवीण साळुंखे, हवालदार देवेंद्र सासणे, शरद जाधव, प्रशांत देसाई, अरुण कानडे, सचिन यादव, संग्राम गायकवाड, संताजी पाटील, चंद्रकांत कोळी, सचिन सुतार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
काही दिवसांपूर्वी या ठिकाणी खासगी बसमधून कोकेन तस्करी करणार्‍यास अटक केली होती. त्यानंतर पुन्हा ही कारवाई झाली. हे ड्रग्ज पेडलर नेमके कोणत्या ठिकाणी ड्रग्ज देणार होते. कोठून आणले, याची पाळेमुळे खणण्याचे पोलिसांसमोर आता आव्हान उभे राहिले आहे.

COMMENTS