Homeताज्या बातम्यासंपादकीय

ब्राह्मणेतर चळवळीची शकले : ओबीसी-मराठा संघर्ष! 

ओबीसी - मराठा जातीसमाज आरक्षणाच्या प्रश्नावर एकमेकांसमोर शत्रूभावी पध्दतीने उभा ठाकला. जे आरक्षण सध्याच्या काळात सार्वजनिक क्षेत्राचे शंभर टक्के

ब्रिटनचे माणूस केंद्रीत धोरण ! 
मनुवादी पवार ते पेरियारवादी स्टॅलिन : एक फरक ! 
नवाब मलिकांचा बॉम्ब पवारांनी फुसका केलाय?

ओबीसी – मराठा जातीसमाज आरक्षणाच्या प्रश्नावर एकमेकांसमोर शत्रूभावी पध्दतीने उभा ठाकला. जे आरक्षण सध्याच्या काळात सार्वजनिक क्षेत्राचे शंभर टक्के खाजगीकरण करून आधीच उच्चाटन करण्यात आले आणि ज्यात वर्षानुवर्षे जातीव्यवस्थेच्या जोखडात न भरडले गेलेले उच्चजात वर्ग देखील आर्थिक मागासलेपणाचे कटोरे घेऊन रांगेत आले आहेत! अशातच विद्यावाचस्पती असणारे अभ्यंकर यांचे स्वतंत्र ब्राह्मण भूमीची मागणी पुढे आली आहे. या सर्वांचा अन्वयार्थ नेमका काय घ्यावा हा आजचा महत्वपूर्ण प्रश्न आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा जातीव्यवस्थेविरूध्द असण्याबरोबरच भांडवलदार व्यवस्थेविरूध्दही एकाचवेळी होता. या लढ्यात एक समान पक्ष किंवा बाजू व्यवस्थेत निर्माण झाली होती. त्याचे नाव ब्राह्मणेतर! स्वतंत्र भारतात ब्राह्मणेतर संघटनेचे सामाजिक वर्चस्व लक्षात घेता पंडित नेहरू यांनी जराही वेळ न दवडता ब्राह्मणेतरांना राजकीय सत्तास्थानी आणण्याचा निर्णय घेतला. परंतु, महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व मराठा समाजाने केल्यामुळे त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीतील मराठेतरांना वाऱ्यावर सोडले. सत्तेच्या आस्वादात रमलेले मराठा आणि सत्तेबाहेर फेकून दिलेले मराठेतर जे आज ओबींसीं म्हणून एकवटले आहेत, यांचा हा संघर्ष कधी ना कधी होणारच ही काळ्या दगडावरची रेघ होती/आहे! ब्राह्मणेतर चळवळीची ही शकले ब्राह्मणेतर असणाऱ्या मराठा समाजानेच केली. मराठा समाज सत्तेत बिनधोक असेपर्यंत त्यांच्याशी संघर्ष घेणे हे पाषाणावर डोके ठोकून स्वतःला घायाळ करून घेण्यासारखेच होते. कारण, मंडल आयोग लागू झाला नव्हता तोपर्यंत ब्राह्मणेतर चळवळीचा पाया असलेल्या ओबीसींना एकत्र येण्यासारखे सबळ कारण नव्हते. आज ते त्याला मिळाले आहे. जाती निर्मुलनाच्या लढ्याची पूर्व‌अट जातींचा संघर्ष उभा राहण्यात होईल. परंतु, तो शत्रूभावी न राहता मैत्रीपूर्ण उभा राहील. जातींचे दुष्परिणाम हे जाती लढ्याला निमंत्रण देणारे ठरून उभा राहिलेला संघर्ष जाती निर्मुलनाच्या दिशेने जाऊ शकतो. परंतु, आज, महाराष्ट्रात उभा राहिलेला ओबींसीं – मराठा संघर्ष अतिशय शत्रूभावी पध्दतीने पुढे आणला जात आहे. याचा अर्थ या लढ्याला जन्म देणाऱ्या शक्ती या दोन्ही समाज घटकांच्या बाहेरच्या आहेत; आणि त्या शक्ती दोन्ही गटांना नियंत्रित करित आहेत. अशावेळी येणारी ब्राह्मण राष्ट्राची मागणी याचा या घटनाक्रमाशी काही संबंध येतो का? हा प्रश्न विचारला तर सकृतदर्शनी त्याचे उत्तर कदाचित नकारार्थी असेल! परंतु, वस्तुस्थिती मात्र तशी नाही! मराठा हा सत्तेतील नियंत्रक घटक न राहिल्याने त्या समाजातील घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ती खदखद व्यक्त करण्यासाठी त्यांनी ओबींसीं हे साॅफ्ट टार्गेट निवडले आहे. हे टार्गेट निवडण्यामागची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे तमाम ओबीसी समुदाय हा भाजपच्या छत्रछायेखाली मतदार म्हणून एकवटला, अन् दुसरे कारण म्हणजे तो सामाजिक पातळीवर ओबींसीं म्हणून ओळखला जात असला तरी गावांतील जातवस्ती मध्ये तो अल्प संख्य ठरतो. त्यामुळे, त्याला गावगुंड स्वरूपाच्या दहशतीत आणून मराठा समाजाच्या सत्ता वर्चस्वाच्या राजकारणाकडे खेचून आणणे, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अर्थात, आता ओबीसी आपल्या सामाजिक, राजकीय अस्मितेवर उभा राहिला आहे. तो आता कोणत्याही दहशतीने घाबरणारा नाही. ही बाब जालना अंबड च्या सभेने स्पष्ट केली आहे. अंबड च्या महासभेत राजकीय वक्त्यांनी आपापल्या पक्षांचे पुळके याठिकाणी सोडण्याचा प्रयत्न केला; परंतु, आयोजक तरूणांनी त्यावर आक्षेप घेत ओबीसी राजकीय नेत्यांची मक्तेदारी मोडीत काढली. ही आशादायक बाब आहे!

COMMENTS