बहुजनांचा संघर्ष कुणाविरुद्ध ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

बहुजनांचा संघर्ष कुणाविरुद्ध ?

देशभरात एकीकडे बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय समस्या अधिक तीव्र होत आहेत. तर दुसरीकडे याच समाजाच्या काही ठराविक नेत्यांना आश्रय दे

राजकीय संघर्ष
धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत…  
मराठा-ओबीसी संघर्षाचा नवा अध्याय

देशभरात एकीकडे बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय समस्या अधिक तीव्र होत आहेत. तर दुसरीकडे याच समाजाच्या काही ठराविक नेत्यांना आश्रय देऊन प्रस्तापित धोरणकर्ते बहुजन समाजाची दिशाभूल करून त्यांची मते घेऊन आपले राजकीय वैभव शाबूत ठेवत आहेत. बहुजन समाजातील असे नेते खऱ्या अर्थाने समाजाच्या मूलभूत समस्यांमधून समाजाला अद्याप बाहेर काढू शकलेले नाहीत. भारतात संसदीय लोकशाही अंमलबजावणी नंतर सर्व समाजाच्या सर्व समस्या सोडवण्याचे अभिवचन आपल्या संविधानात देण्यात आलेले आहे. मात्र आपल्या धोरणकर्त्यानी त्या अभिवचनाची अंमलबजावणी केली नाही. याचाच दुसरा अर्थ असा की, आपल्या धोरणकर्त्यानी आपल्याला दिलेल्या अभिवचनाची फसवणूक केलेली आहे. आपल्या देशातील राजकीय स्थिती आपण पाहिली तर प्रत्येक समाजात राजकीय नेते आहेत. ते आपल्या समाजाच्या नावावर राजकारण करत आहेत.प्रत्येक समाजात पुढारी असतांना किंबहुना सत्तेत असतांना किंवा विरोधी सरकारमध्ये असतांना देखील समाजाच्या समस्या सुटत नाहीत. समाजाच्या विविध समस्यांना नेमके कारणीभूत कोण आहे? आणि या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे? याची जाणीव बहुजनांच्या नेत्यांना आहे का? याचा उहापोह करणे क्रमप्राप्त.

बहुजन समाज या शब्दाचा उदय केव्हा आणि कधी झाला या भानगडीत पडण्यापेक्षा बहु म्हणजे बहुसंख्य आणि जन म्हणजे लोक म्हणजेच बहुसंख्य लोक असा त्याचा साधा अर्थ. बहुजन हा शब्द तसा सामाजिक, राजकीय अर्थानं अलीकडे जास्त प्रचलित केला गेला. भारताच्या मानवी इतिहासाचा धांडोळा घेतल्यानंतर बहुजन या शब्दाचा वापर बुद्धकालीन कालखंडात आढळतो. “बहुजन सुखाय, बहुजन हिताय” हे ब्रीद वाक्य बुद्धाचे आहे जे आपल्या देशाच्या सर्वोच असलेल्या राष्ट्रपतींच्या आसनाच्या मागील बाजूवर कोरलेले आहे. आपल्या आकाशवाणी केंद्राचे ब्रीद देखील “बहुजन सुखाय, बहुजन हिताय” हेच आहे. असो… सामाजिक मागासलेपणा अधोरेखित करण्यासाठी काही विशिष्ट समाज समूहांना उद्देशून हा शब्द वापरला जात आहे. किंबहुना आरक्षणाच्या संदर्भात हा विशेष अर्थानं वापरला जातो. प्रामुख्यानं एससी, एस्टी, एनटी, आदिवासी वगैरे आणि सोबत ओबीसी समूह किंवा वर्ग मिळून बहुजन समाज अशी नवी आणि संख्यात्मक, समुहात्मक व्याख्या उदयाला आली. बहुजन समाजाच्या प्रगतीपुढील अडथळे हे धर्मसत्तेचे प्रस्तापित आणि राजसत्तेमधील प्रस्तापित आहेत हे खरेच. हे बहुजन समाजाला देखील माहित आहे. हा समाज किंबहुना त्या समाजाचे नेते हे धर्मसत्तेमधील प्रस्तापित ब्राम्हण यांना नेहमी चिमटे काढत असतात. यापुढे जाऊन मनुवादी, ब्राम्हणवादी अशा व यापेक्षा खालच्या शब्दाने हिणवत असतात. याला बहुजनातील एकही नेता अपवाद नाही. मात्र अलीकडे मनुवाद्यांच्या पक्षामध्ये राहून काही नेते बहुजनांचे राजकारण करत आहेत. हे म्हणजे, शेळीने आणि बिबट्याने एका पिंजऱ्यात संसार करणे होय. याचे उत्तम उदाहरण गोपीचंद पडळकर हे. हे पडळकर भाजपचे विधान परिषदेवर घेतलेले आमदार आहेत. ते धनगर समाजाचे नेते. धनगर समाज हा महाराष्ट्रात लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचा समाज. पण या समाजाचे राज्याच्या सभागृहात किंवा देशाच्या संसदेत राजकीय प्रतिनिधीत्व करणारांची संख्या टक्केवारीत मोजली तर ते शुन्य टक्के आहेत. याला कारणीभूत कोण? पडळकर महोदय नेहमी आरोपाच्या फैरी आपल्या विरोधकांवर झाडात असतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला अहमदनगर प्रशासन परवानगी देत नसल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त केला. “चौंडीचे प्रशासन प्रस्थपितांच्या पवार घराण्याच्या दबावाखाली आमच्या वर्षानुवर्ष चालत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाला परवानगी दिली जात नाही. बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही हे ध्यानात घ्यावे. अन्यथा संघर्ष अटळ आहे,” असा इशारा गोपीचांद पडळकर यांनी दिला आहे. पण संघर्ष कुणाविरुद्ध करणार? आता पडळकरांना बहुजन समाजाचा इतिहास माहित आहे का? असा आपला प्रश्न. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असे एक सूत्र आहे. ते पडळकरांसह सर्वच बहुजन समाजाच्या पुढाऱ्यांना लागू पडते. “हिंदू संस्कृतीच्या जिर्णोद्धारकर्त्या, कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांच्या जयंती कार्यक्रमाला परवानगी दिली जावी अशी त्यांची मागणी. ती मिळेल यात शंका नाही. होळकर हिंदू संस्कृतीच्या जिर्णोद्धारकर्त्या होत्या यापेक्षा त्या सत्ताधीश होत्या हे महत्वाचे आहे. नेमके हेच बहुजन समाजाला (धनगरांना) समजत नाही. आणि इथेच मोट्ठी खुट्टी आहे. आपली हिंदू संस्कृती वैदीक संस्कृतीने पोसलेली आहे. वैदिक संस्कृतीचे नियम हे मनुस्मृतीने सांगितले आहेत. मग या मनुस्मृतीच्या वर्णव्यवस्थेत धनगरांचे किंबहुना बहुजन समाजातील विविध जातीचे स्थान का? आणि आज बहुजन समाजाच्या ज्या समस्या आहेत त्याला मनुस्मृतीचा संदर्भ आहे. हेच बहुजनांच्या लक्षात येत नाही. बहुजनाला जो बदल या व्यवस्थेमध्ये करायचा आहे त्याचा पाया काय आहे हेच यांना माहित नाही. मग बहुजनांचा संघर्ष कुणाविरुद्ध? 

COMMENTS